(१) रामा गांवाहून आला.
(२) विठू शाळेंत गेला.
(३) गंगू झोपाळ्यावर बसते.
(४) गाणें म्हटल्यानें मूल झोपेल.
(१) आला हें क्रियापद. येणें ही क्रिया. आला कोण ? रामा येण्याची क्रिया करणारा रामा.
(२) गेला हें क्रियापद. जाणें ही क्रिया. गेला कोण ? विठू. जाण्याची क्रिया करणारा विठू. त्याचप्रमाणें बस कोण ! गंगू. झोपेल कोण ? मूल. यांत रामा, विठू, गंगू, मूल हे क्रिया करणारे आहेत. क्रिया करणार्यास दाखविणारा जो शब्द त्यास कर्ता म्हणतात. रामा, विठू हे शब्द कर्ते होते.
१ यमू घरांत आहे. २ बाबा घरीं नाहींत. आहे कोण ? यमू. यमू हा शब्द कर्ता. नाहींत कोण ? बाबा. बाबा हा शब्द कर्ता.
(१) गणू आंबा खातो.
(२) काशी पोळ्या करील.
(३) मुलांनीं चित्रें काढलीं.
(४) गड्यानें घोड्यास बांधिलें.
(५) मालकाने नोकरास बोलाविलें.
गणू हा कर्ता, खातो हें क्रियापद. गणू खातो काय ? आंबा. काशी हा कर्ता, करील हें क्रियापद. काशी करील काय ? पोळ्या. मुलांनीं काढिलें काय ? चित्रें. गड्यानें कोणास बांधिलें ? घोड्यास. मालकानें कोणाला बोलाविलें ? नोकरास. कर्त्यानें जी क्रिया केली ती काय केली किंवा कोणास केली हें दाखविणार्या शब्दास कर्म म्हणतात. आंबा, पोळ्या, चित्रें, घोड्यास, नोकरास हे शब्द कर्म होत.
(१) शामूनें लेखणी केली. काय केली ? लेखणी. लेखणी हा शब्द कर्म. (२) विमल गाणें म्हणतें. काय म्हणतें ? गाणें. गाणें हा शब्द कर्म.
आला, बसते, झोपेल या क्रियापदांस कर्माची जरूरी नाहीं. रामा गांवाहून आला, या वाक्याचा अर्थ कर्माशिवाय पुरा होतो. अशा कर्माची आवश्यकता नसलेल्या क्रियापदास अकर्मक ( कर्म नसलेले ) क्रियापद म्हणतात. आहे, नाहीं, बसतो, जाईल हीं अकर्मक क्रियापदे.
गणू खातो या वाक्यांत काय खातो हें सांगितल्याशिवाय अर्थ पूर्ण होत नाहीं. अशा कर्माची आवश्यकता असणार्या क्रियापदास सकर्मक ( कर्म असलेलें ) क्रियापद म्हणतात. खातो, करील, काढिली, बांधिलें, बोलाविलें हीं सकर्मक क्रियापदें.
गांवाहून कोण आला ? रामा. घोड्यास कोणीं बांधिलें ? गड्यानें. क्रियापदास कोण ? अथवा कोणी ? असा प्रश्न केल्यानें कर्ता निघतो.
गणू खातो काय ? आंबा. मालकानें कोणास बोलाविलें ? नोकरास. क्रियापदाला काय ? अथवा कोणास ? असा प्रश्न केल्यानें कर्म सापडतें.