१ आमची आत आज गांवाहून आली. आत - आत्या नाम.
२ ती आंत बसली आहे. आंत मध्यें - स्थलवाचक क्रि. वि. अव्यय.
३ सोनारानें पांच आंगठ्या बनविल्या. पांच - संख्या विशेषण.
४ त्यांपैकीं एकीवर पाच जडविलें आहे. पाच - रत्न नाम.
५ नदीकांठीं एक नाव आहे. नाव नाम.
६ तीवर मालकाचें नांव कोरलें आहे. नांव ( प्रत्येक वस्तूचें नांव ) नाम.
७ गांवांत देवीची सांत ( सांथ ) आहे. सांत - साथ नाम.
८ सात दिवसांत सर्वांनीं लस टोचून घ्यावी. सात संख्या विशेषण.
९ यावर्षी मीं पुष्कळ पुस्तकें वाचिलीं. वाचिलीं. ( वाचणें ) क्रियापद.
१० म्हणूनच मी यावेळीं नापासांसून वांचलों. वांचलों. ( जगणें ) क्रियापद.
११ तो शाळेंत पोचला. तो - तृ. पु. वा. सर्वनाम.
१२ तोंच घंटा झाली. तों - इतक्यांत. कालवाचक क्रि. वि. अव्यय.
१३ गोपाळा कां गेला बरें. काम - कारण बोधक.
१४ मी येऊं का ? का - संमत्यार्थक.
या शब्दांतील अनुस्वार त्यांच्या उपयोगांतील फरक दाखविण्यासाठीं आले आहेत. या शब्दांचा वाक्यांतील उपयोग स्पष्ट असतो; जसें - नदींत नाव आहे. यांत नाव शब्दाचा अर्थ पदार्थाचें नांव असा होत नाहीं. पुस्तकावर नांव घालावें. यांत नांव म्हणजे नदींतील असा अर्थ कोणीही करणार नाहीं. म्हणून असले अनुस्वार लेखनांत गाळावेत असें कित्येक विद्वानांचें मत आहे. तों, इतक्यांत, तोंवरील अनुस्वार उच्चारित अनुस्वार आहे. या अनुस्वारांना व्याकरण नाहीं. तरी उपयोग म्हणून ते ठेवण्यास हरकत नाहीं.
(१) एथें, तेथें, कोठें, मागें, पुढें, मध्यें, खालें वरतीं, सभोंवतीं.
(२) जेव्हां, तेव्हां, केव्हां, एव्हां;
(३) पूर्वीं, हल्लीं, यंदां, उद्यां, परवां, आतां
(४) एकदां, दोनदां, हजारदां,
(५) शेंकडों, हजारों, लाखों,
(६) देतां, घेतां, खातां, पितां,
(७) देतांना, घेतांना, जातांना,
(८) कधीं, नेहमीं, अगदीं, विषयीं, संबंधीं,
(९) पेक्षां, सुद्धा,
(१०) कांहीं, नाहीं, मुळीं,
(११) कीं, पावतों, संवय.
या शब्दांतील अनुस्वारांस व्याकरण नाहीं. अशा ठराविक नांवाखाली येणार्या अनुस्वाराची कांहीं जरूरी नाहीं म्हणून तेही लेखनांतून गाळावयास कोणतीच हरकत नाहीं.
आणखी असे पुष्कळ शब्द आहेत. जसें - दांत, कांठ, ठेंच, पोंच, चोंच, कांटा, फाटा, कांच.
कर, बोल, जा, ये या धातूंवरून करणें, बोलणें, जाणें, येणें हीं क्रियावाचक नामें बनलीं आहेत. चोरी करणें म्हणजे चोरीचें कृत्य, खोटें बोलणें म्हणजे खोटें बोलण्याचें कृत्य; हीं क्रियावाचक नामें नपुंसकलिंगी समजून त्यांवर अनुस्वार देतात. आणखी उदाहरणें - निजणें, उठणें, बसणें, पळणें, जेवणें, पिणें इ.
दाणे, आणे, फुटाणे, पाहुणे हे शब्द दाणा, आणा इ. शब्दांचीं अनेकवचनी रूपें होत. त्यांवर अनुस्वार देऊं नये.
आंतील, आंतला, आंतल्या, आंतून या शब्दांवर अनुस्वार आहेत. हे शब्द दुसर्या शब्दांस जोडले तर त्यांवरही अनुस्वार देतात.
जसें - घरांतील, घरांतला, घरांतल्या, घरांतून
शाळेंतील, शाळेंतला, शाळेंतल्या, शाळेंतून
बोलतांना या अनुस्वारांचा आपण उच्चार करीत नाहींत. या अनुस्वारांना विशेष व्याकरणही नाहीं. हे अनुस्वार ठराविक म्हणून गाळले तरी चालेल.
(१) करूं, उठूं, बसूं, वळूं, खाऊं, बोलूं, म्हणूं, पाहूं, काढूं, लिहूं.
(२) खडू, चाकू, भाऊ, खाऊ, कुंकू, तराजू, बापू, गणू, विनू, यमू.
पहिल्या यादींतील शब्द धातुसाधित अव्यये दुसर्या यादींतील शब्द नामें आहेत. पहिल्या प्रकारच्या शब्दांवर अनुस्वार देण्याचा प्रघात आहे. हे अनुस्वार अनुच्चारित असून त्यांवरील अनुस्वारांचें कांहीं कारण दिसत नाहीं, म्हणून ते गाळावे.