प्रयोगासंबंधीं अनुस्वार
व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
शुद्धलेखन १ लें
मी एकदां मामांच्या गांवीं होतों. मामाचें गांव लहान खेडें आहे. तेथें मीं एक विचित्र प्रकार पाहिला. बरोबर मामाही होते. एका मोठ्या मांडवांत नवरदेव नवर्यांची खूप गर्दी जमली होती. त्यांत कांहीं नवरदेव तीन चार वर्षांचे होते. कांहीं नवर्या तर एक दोन वर्षांच्या असाव्यात, भटजीबुवा एका उंच झाडावर चढले. त्यांनीं दोन तीन मंगलाष्टकें म्हटलीं, वाजंत्रीं वाजलीं व शें. सव्वाशें लग्नें एकदम लागलीं ! मोठ्या माणसांनीं नवरानवरीस कडेवर घेतलें व आपल्या बिर्हाडी नेलें. तो देखावा पाहून आम्ही चकित झालों. बालविवाहाची ही कमाल मर्यादा नव्हे काय ? या पद्धतीला कोणी कानबाईचीं लग्नें म्हणतात. ही तर्हा कोणीही पाडली असो, ती सामाजिकदृष्ट्यां अत्यंत घातुक आहे; ती बंद पाडण्यास सर्वांनीं झटावें.
या लिहिण्यांतील कांहीं प्रयोग पाहूं.
पान नं. ४३ कोष्टक.
या उदाहरणावरून दिसून येईल कीं, कर्तरि प्रयोगांत क्रियापद कर्त्याप्रमाणें असतें. कर्मणि प्रयोगांत कर्माप्रमाणें असतें. कर्मणि प्रयोगांत कर्ता तृतीया विभक्तीचा असतो. भावे प्रयोगांत कर्ता तृतीया विभक्तीचा व क्रियापद नेहमी नपुंसकलिंगी एकवचनी असतें. भावेप्रयोगांत कर्माला द्वितीयेचा ‘ स ’ प्रत्यय लागतो.
मी, आम्ही, तुम्ही, कोणी या शब्दांवर ते कर्मणि व भावे प्रयोगांत कर्त्याच्या जागीं असले तर त्यांवर अनुस्वार द्यावा. कारण त्यावेळीं त्यांची तृतीया विभक्ति असते. एरव्ही मी, आम्ही, तुम्ही, कोणी यांवर अनुस्वार देऊं नये.
जसें :- मी - होतों. मी प्रथमा. मीं - पाहिला. मी - तृतीया.
कोणी - म्हणतात. कोणी प्रथमा. कोणीं - पाडिली. कोणीं तृतीया.
इतर उदाहरणें. -
आम्ही अभ्यास करतों. आम्ही प्रथमा.
आम्हीं अभ्यास केला. आम्हीं तृतीया.
तुम्ही यात्रेंत होतां ? तुम्ही प्रथमा.
तुम्हीं यात्रा पाहिली ? तुम्ही तृतीया.
१ मी पुस्ती लिहितों या वाक्याशीं तो पुस्तक लिहितो हें वाक्य जुळतें. त्यानें पुस्तक लिहितो हे वाक्य जुळत नाहीं. मी - प्रथमा.
२ मीं पुस्ती लिहिली हें वाक्य त्यानें पुस्ती लिहिली या वाक्याशीं जुळतें. तो पुस्ती लिहिली या वाक्याशीं जुळत नाहीं. मीं - तृतीया.
अशा रितीनेंही वरील सर्वनामांची विभक्ति ओळखण्याची संवय करतां येईल.
स, ला, ना हे प्रत्यय लागलेले शब्द कर्माच्या जागीं असल्यास त्यांची द्वितीया विभक्ति समजावी. यमूनें गाईस बांधिलें. गड्यानें मुलांना बोलाविलें. इतर वेळीं स, ला, ना हे प्रत्यय लागलेले शब्द चतुर्थी विभक्तीचे समजावे.
(१) बाबा डोक्यास रुमाल बांधतात.
(२) दादा आज गांवाला गेले.
कर्मणि प्रयोगांत कर्म नपुंसकलिंगी असतां क्रियापद नपुंसकलिंगी असलें म्हणून त्यावर अनुस्वार द्यावा.
(१) यमूनें पुस्तक आणिलें, यमूनें पुस्तकें आणिलीं.
भावे प्रयोगांतील क्रियापद नेहमीं एकवचनी नपुंसकलिंगी असतें. म्हणून त्यावर नेंहमीं अनुस्वार द्यावा.
(१) कावळ्यानें चिमणीस धरिलें.
(२) वाघानें शेळ्यांस खाल्लें.
कर्तरि प्रयोगांतील क्रियापदावरील अनुस्वारासंबंधानें निश्चित असें नियम थोडक्यांत सांगतां येत नाहींत. मी - आहें, आम्ही - आलों, मी - होतों, आम्ही - आहोंत. मी - करितों. आम्ही - जातों. अशा प्रथमपुरुषी कर्त्याच्या क्रियापदावर अनुस्वार द्यावा.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP