नामें व सर्वनामें यांचा इतर शब्दांशीं संबंध
( विभक्ति - विचार )
हा पहा गुलाब. मीं कुंडी आणली. तींत गुलाबाची काडी लाविली. तिला पाणी घातलें. गुलाबास खत दिले. गुलाब भरभर वाढला. त्यास फुलें आली. गुलाबानें मला फुलें दिलीं. गुलाबाचीं फुलें मला फार आवडतात.
यांत मूळ शब्द जो गुलाब त्यांत गुलाबाची, गुलाबास, गुलाबानें, गुलाबाजीं असे फेरफार झाले आहेत. ती या सर्वनामांत तींत, तिला; असे, तो या सर्वनामांत त्यास आणि मी सर्वनामांत मला असा फेरफार झाला आहे. आपण मागें नामें व सर्वनामें यांत लिंगवचनामुळें कोणते फेरफार होतात हें पाहिलें आहे. परंतु या ठिकाणीं झालेले हे फेरफार निराळ्याच प्रकारचे आहेत. त्यांचा काय उपयोग होतो तें आतां पाहूं. त्यासाठीं खालील वाक्यें वाचा.
(१) रामा शाळे- गेला. रामा शाळेंत गेला.
(२) यमू लेखणी- लिहिते. यमू लेखणीनें लिहिते.
(३) मी बाळू- धडा दिला. मीं बाळूस धडा दिला.
(४) ती- दूध आवडते. तिला दूध आवडतें.
(५) आई दादा- बोलते. आई दादाशीं बोलते.
(६) तो- चित्र काढलें. त्यानें चित्र काढलें.
यांत रामा, यमू, आई हे शब्द नामें आहेत. मी, ती, तो हीं सर्वनामें आहेत. रामा शाळें जातो असें म्हतल्यानें अर्थ नीट समजत नाहीं. रामा शाळेंत जातो असें म्हटल्यानें अर्थ नीट समजतो. रामा कोथें जातो ? शाळेंत जातो. शाळेंत शब्दाचा जातो क्रियापदाशीं संबंध आहे. त्याप्रमाणें लेखणीनें लिहिते यांत लेखणीनें या शब्दाचा लिहिते या क्रियापदाशीं संबंध नीट जुळतो. बाळूस या शब्दाचा दिला या क्रियापदाशीं तिला, दाराशीं, त्यानें या शब्दांचा आवडते, बोलते, काढिलें या क्रियापदांशीं नीट संबंध जुळ्लतो. प्रत्येक वाक्याच्या पहिल्या अर्ध्या भागांत बाळू- दिला, ती दूध आवड, ते आई दादा बोलते हे संबंध नीट जुळत नाहींत; म्हणून त्या शब्दांत बाळूस, तिला, दादाशीं हे फेरफार केले आहेत. यावरून लक्षांत येईल कीं, नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशीं संबंध जोडण्यासाठीं त्यांत ( नामांत व सर्वनामांत ) फेरफार करतात.
हें गणूचें पुस्तक आहे, हा शेतकर्याचा बैल आहे, ती शेजार्याची म्हैस आहे. गणूचें काय ? पुस्तक, शेतकर्याचा काय ? बैल. शेजार्याची काय ? म्हैस. या उदाहरणांवरून नामाचा केव्हां केव्हां दुसर्या नामाशींही संबंध असतो. तसाच तो त्याचा कोट, तिची पाटी, त्याचें शेत, असा सर्वनामाचाही दुसर्या नामाशीं संबंध असतो. तो संबंध दाखविण्यासाठीं सर्वनामांतही फेरफार होतात.
नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशीं असलेला संबंध दाखविण्यासाठीं त्या नामाचें व सर्वनामाचें जें रूप करितात, त्यास विभक्ति म्हणतात.
विभक्तीचीं रूपें करण्यासाठीं नामास व सर्वनामास जीं अक्षरें जोडावीं लागतात त्यास विभक्ति प्रत्यय म्हणतात. गुलाबाचा, गुलाबास, गुलाबानें यांत चा, स, नें हे विभक्ति - प्रत्यय आहेत व ते गुलाब या शब्दास जोडून विभक्तीची निरनिराळीं रूपें झालीं आहेत.
विभक्ति - प्रत्यय लावण्यापूर्वीं नामाचें जें रूप करितात, त्यास सामान्यरूप म्हणतात. आंबा - आंब्यास, घर - घरांत, नदी - नद्यांनीं, पाणी - पाण्य़ाहून यांत आंब्या, घरा, नद्या, पाण्या हीं आंबा, घर, नदी पाणी या नामांचीं सामान्यरूपें होतील.
निरनिराळ्या आठ विभक्ति मानिल्या आहेत. त्या व त्यांचें प्रत्यय पुढें दिले आहेत.
विभक्ति प्रत्यय
एकवचन अनेकवचन
१ प्रथमा प्रत्यय नाहींत. प्रत्यय नाहींत.
२ द्वितीया स, ला, तें. स, ला, ना, तें.
३ तृतीया नें, एं, शीं. नीं, हीं, ईं, शीं.
४ चतुर्थी स, ला, तें. स, ला, ना, तें.
५ पंचमी ऊन, हून. ऊन, हून.
६ षष्ठी चा, ची, चें. चा, ची, चें.
७ सप्तमी त, ई, आं. त, ईं, आं.
८ संबोधन प्रत्यय नाहींत. नो.
नामाचें मूळ रूप तीच प्रथमा समजतात. जसें ‘ घोडा ’, ‘ बैल ’ प्रथम एकवचन. ‘ घोडे ’; ‘ बैल ’ प्रथमेचें अनेकवचन.
षष्ठी विभक्तीचा संबंध नामाशींच असतो. बाकी सर्व विभक्तीचा संबंध क्रियापदांशीं असतो, जसें - राजाचा वाडा, पाटलाची घोडी, चंद्राचें चांदणें. षष्ठी विभक्तीचा ‘ चा ’ या प्रत्ययाचीं लिंगभेदाप्रमाणें ची स्त्रीलिंगी, चें नपुंसकलिंगी अशीं रूपें होतात.
घर या शब्दास विभक्तिप्रत्यय कसे लावावे तें पहा.
विभक्ति एकवचन अनेकवचन
१ प्रथमा घर. घरें.
२ द्वितीया घरास, घराला. घरांस, घरांला, घरांना.
३ तृतीया घरानें, घराशीं. घरांनीं, घरांशीं.
४ चतुर्थी घरास, घराला. घरांस, घरांला, घरांना.
५ पंचमी घराहून, ( घरून ). घरांहून.
६ षष्ठी घराचा, घराची, घराचें. घरांचा, घरांची, घरांचें.
७ सप्तमी घरांत, घरीं. घरांत, घरीं.
८ संबोधन .......... घरांनो.
यांत विभक्तींचे कांहीं प्रत्यय घर या शब्दास लावतां आले नाहींत ते कवितेंत येतात. तें, एं, हीं, ईं ( तृतीया ), ऊन, असे ते प्रत्यय होत.
(१) तो वशिष्ठ वदला भरतातें । भरत + तें = भरतातें ( द्वितीया )
(२) विद्युल्लता नरें ती केली संदेशहारिका दासी । नर + एं = नरें तृतीया. ( नरें - मनुष्यानें ).
(३) तापे सूर्य नदादिकांवरि करिं उष्णा जला शोषवी । कर - किरण, कर + ईं = करीं तृतीया. ( करीं - किरणांनीं ).
(४) काकांहीं अपुलीं पहा घरकुलीं झाडावरी डाळिलीं । काक - कावळा. काका + हीं = काकांहीं तृतीया. ( कावळ्यांनीं ).
(५) अंतरीं निर्मळ वाचेचा रसाळ । त्याचे गळां माळ असो नसो ॥ गळा + आं = गळां. गळां - गळ्यांत सप्तमी.
तूं या सर्वनामास खालीं दिल्याप्रमाणें विभक्ति प्रत्यय लागतात.
विभक्ति एकवचन अनेकवचन
१ प्रथमा तूं. तुम्ही.
२ द्वितीया तुला, तुजला. तुम्हांस, तुम्हांला.
३ तृतीया तूं, त्वां, तुजशीं. तुम्ही, तुम्हांशीं, तुमच्याशीं.
४ चतुर्थी तुला, तुजला. तुम्हांस, तुम्हांला.
५ पंचमी तुजहून, तुझ्याहून. तुम्हांहून, तुमच्याहून.
६ षष्ठी तुझा, तुझी, तुझें. तुमचा, तुमची, तुमचें.
७ सप्तमी तुझ्यांत. तुम्हांत.
८ संबोधन .......... ..........
मी या सर्वनामाचीं षष्ठी विभक्तीचीं रूपें माझा, माझी, माझें आमचा आमचीं, आमचें अशीं होतात. त्याप्रमाणेंच आपण या सर्वनामाचीं षष्ठीचीं रूपें आपला, आपली आपलें, आपला, आपली, आपलें अशीं होतात.
वरील रूपांत द्वितीया व चतुर्थी विभक्तींचीं रूपें सारखींच दिसतात. त्यांत द्वितीया केव्हां समजावी व चतुर्थीं केव्हा समजावी हें पुढें सांगितलें आहे.