विभक्तिसंबधी अनुस्वार तृतीया
व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
विभक्तीसंबंधीं अनुस्वार
शुद्धलेखन १ लें
तृतीया विभक्ति
यमुने, नरहरशेट सोनाराकडे जा. त्यांनीं तुझ्या बांगड्या व माझी अंगठी तयार केली काय तें पाहून ये. तीन दागिने देण्यास दोन महिने झाले तरी ते अजून मिळत नाहींत. सध्यां प्रत्येकाला पैशांची अडचण असते, म्हणून सोनें दिलें तेव्हांच अर्धीं मजुरीही आगाऊ दिली. या लोकांशीं कसें वागावें हेंच समजत नाहीं. माणसांनीं हेलपाटे तरी किती घालावेत ! शालिनी तूंही यमूबरोबर जा. शेटजींनीं दागिन्यांचें कांहीच काम केलें नसेल तर आमचें सोनेंच घेऊन चला म्हणावें. येतांना मावशी किंवा वहिनी घरीं भेटल्या तर त्यांना म्हणावें तुम्हांला आईनें बोलावलें आहे; आणि शिंप्यानें तुमचे परकर शिवले असतील तर तेही आणा. शिंप्याशीं बोलत बसू नका. लवकर या. वाटेनें विनाकारण गमूं नका बरं. नाहींतर तुम्हांस शाळेला उशीर होईल.
या शुद्धलेखनांत खालील शब्दांची तृतीया विभक्ति आहे.
मूळ शब्द प्रत्यय शब्द वचन
तो नीं त्यांनीं अनेकवचन
लोक शीं लोकांशीं अनेकवचन
माणूस नीं माणसांनीं अनेकवचन
शेटजी नीं शेटजींनीं अनेकवचन
आई नें आईनें एकवचन
शिंपी नें शिंप्यानें एकवचन
शिंपी शीं शिंप्याशीं एकवचन
वाट नें वाटेनें एकवचन
एकवचनी नें, शीं व अनेकवचनी नीं, शीं या प्रत्ययांवर अनुस्वार आलेल आहेत. मागें कवितेंत येणार्या तृतीयेच्या हीं, हें या प्रत्ययांचीं त्यांही - त्यांनीं, करी - किरणांनीं अशीं उदाहरणें दिली आहेत. यावरून सामान्य गोष्ट लक्षांत येईल कीं, तृतीया विभक्तीच्या सर्व प्रत्ययांवर अनुस्वार द्यावा.
शब्दाच्या शेवटच्या अक्षरास अंत्याक्षर म्हणतात. त्याच्या जवळच्या अक्षरास उपांत्याक्षर म्हणतात. त्यांनीं या शब्दांत त्यां हें उपान्त्याक्षर आहे. लोकांशीं यांत कां हें उपान्त्याक्षर आहे. तसेंच शेटजींनीं यांत जीं, माणसांनीं यांत सां हीं उपान्त्याक्षरें आहेत. या सर्व उपान्त्याक्षरांत अनुस्वार आहेत. यावरून नियम ठरवितां येईल कीं, तृतीया विभक्तीच्या अनेकवचनी प्रत्ययामागील जवळच्या ( उपान्त्य ) अक्षरावर अनुस्वार द्यावा.
यमुने, दागिने, महिने या शब्दांत शेवटीं ने अक्षर दिसतें. तें तृतीयेचा प्रत्यय नाहीं. यमुना - यमुने यांत यमुनेला हाक मारली आहे. यमुने - संबोधन एकवचन, दागिना, महिना या पुल्लिंग्गी शब्दांचीं दागिने, महिने हीं अनेकवचनी रूपें होत.
मावशी, शालिनी, मालिनी, वहिनी हे तर मूळ शब्दच आहेत. सोनें हाही ( नपुंसकलिंगी ) मूळ शब्द आहे. तेही, तूंही यांत ही हें शुद्ध - शब्दयोगी अव्यय आहे. तें जोडल्यामुळें शब्दांत कोणताच बदल होत नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP