शब्दांवरून काम करणें असें कळतें.
( क्रियापद - विचार )
(१) आई वाढते.
(२) मूळ जेवतें.
(३) दादा शाळेत गेला.
(४) बाबांनीं पुस्तक वाचलें.
(५) ताई इतक्यांत येईल.
(६) बाई स्वयंपाक करील.
या वाक्यांत वाढते या शब्दावरून आई वाढण्याचें काम करते, असे आपणांस समजलें. जेवतें या शब्दावरून मूल जेवण्याचें काम करतें असें समजते. काम करणें याला क्रिया करणें असेंही म्हणतात. वाढते, जेवलें हे शब्द क्रिया दाखविणारे आहेत. त्याचप्रमाणें गेला या शब्दावरून जाण्याची क्रिया, वाचलें यावरून वाचण्याची क्रिया, येईल यावरून येण्याची क्रिया, करील यावरून करण्याची क्रिया आपणांस समजते.
(१) मी कविता म्हणून, (२) रामा जेवतांना, (३) लहान मुलांनीं शाळेंत जाणें. यांत म्हणून या शब्दावरून म्हणण्याची क्रिया समजते. तसेंच जेवतांना यावरून जेवण्याची, जाणें यावरून जाण्याची क्रिया कळते. म्हणून जेवतांना, जाणें या शब्दांवरूनही क्रियेचा बोध होतो; परंतु वाढते, जेवतें, गेला, वाचलें, येईल, करील या क्रिया दाखविणार्या शब्दांनीं जसें वाक्य पुरें होतें तसें म्हणून, जेवतांना, जाणें या क्रिया दाखविणार्या शब्दांनीं होत नाहीं.
ज्या क्रिया दाखविण्यार्या शब्दावरून वाक्य पूर्ण होतें, त्यास क्रियापद म्हणतात. वाढते, जेवतें इ. शब्द क्रियापदें होत.
ज्या क्रिया दाखविणार्या शब्दानें वाक्य पुरें होत नाहीं, त्यास कृदन्त म्हणतात; म्हणून जेवतांना हे शब्द कृदन्त होत.
(१) रामा घरांत नाहीं. (२) गोविंदा एकटाच आहे. (३) कापूस कोठें होतो ?
नाहीं या शब्दावरून रामाची घरांत नसण्याची स्थिति समजते. आहे या शब्दावरून गोविंदाची असण्याची स्थिति, होतो या शब्दानें होण्याची स्थिति कळते. या स्थितीला व्याकरणांत क्रियाच म्हणतात; म्हणून नाहीं, आहे, होता या स्थिति दाखविणार्या शब्दांनाही क्रियापदेंच म्हणतात.
वाढते या क्रियापदांत मूळ शब्द वाढ आहे. त्याप्रमाणेंच जेवते यांत जेव, गेला यांत जा, वाचलें यांत वाच, येईल यांत ये, करील यांत कर हे मूळ शब्द आहेत. म्हणून यांत म्हण, जेवतांना यांत जेव, जाणें यांत जा हे मूळ शब्द होत. क्रिया दाखविणार्या ( क्रियापद व कृदन्त ) शब्दांत जो मूळ शब्द असतो त्यास धातु म्हणतात. नाहीं, झाला, राहतो या क्रियापदांत नस, हो, राह हे धातु आहेत. मूळ धातूवरून निरनिराळ्या कारणांनीं अनेक क्रियापदें व अनेक कृदन्तें होतात.