प्रयोग - विचार

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


[१] मधू भात खातो. या वाक्यांत मधू हा कर्ता, भात हें कर्म, खातो हें क्रियापद.
मधू पोळी खातो.
मधू पिठलें खातो.
यांत कर्माच्या जागीं स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी शब्द घातले तरी क्रियापद खातो असेंच राहिलें. त्यांत कोणताही बदल झाला नाहीं
यमू भात खाते.
मूलें भात खातात.
बाळ भात खातें.
यांत कर्म भात हा शब्द कायम ठेवून, कर्ता यमू स्त्रीलिंगी घातला तर कियापद स्त्रीलिंगी झालें. मुलें हा अनेकवचनीं शब्द कर्त्याच्या जागीं योजतांच क्रियापदही खातात असें अनेकवचनी झालें.

[२] (१) बाईनें पोळी केली. या वाक्यांत बाईनें हा कर्ता, पोळी हें कर्म, केली हें क्रियापद.
(१) आचार्‍यानें पोळी केली.
(३) मुलींनीं पोळी केली.
यांत कर्म पोळी हा शब्द कायम ठेवून कर्ता, (१) पुल्लिंगी, (२) अनेकवचनी केला. पण क्रियापदांत कोणताही बदल झाला नाहीं. तें पोळी या कर्म शब्दाप्रमाणें स्रीलिंगी एकवचनी राहिलें.
(१) बाईनें पोळ्या केल्या.
(२) बाईनें भांदे केले.
(३) बाईनें भजीं केलीं.
यांत कर्ता कायम ठेवून कर्म (१) अनेकवचनी, (२) पुल्लिंगी, (३) नपुंसकलिंगी घातले तेव्हां क्रियापदही केल्या, केले, केलीं याप्रमाणें फिरलें. म्हणजे क्रियापद कर्माच्या लिंगवचनाप्रमाणं बदललें.

[३] (१) रामूनें गाईस बांधलें. या वाक्यात रामूनें हा कर्ता, गाईस हं कर्म, बांधिलें हें क्रियापद.
(२) चिमानें गाईस बांधलें.
(३) मुलानें गाईस बांधलें.
(४) मुलींनीं गाईस बांधलें.
यांत गाय हें स्त्रीलिंगी कर्म कायम ठेवून कर्त्यांत (२) स्त्रीलिंगी, (३) नपुंसकलिंगी, (४) अनेकवचनी असा बदल केला; पण क्रियापदांत कोणताच बदल झाला नाहीं. तें नपुंसकलिम्गी एकवचनी राहिलें.
(१) रामूनें घोड्यास बांधिलें.
(२) रामूनें शेळ्यांना बांधिलें.
(३) रामूनें वासरांस बांधिलें.
यांत कर्ता कायम ठेवून कर्म (१) पुल्लिंगी, (२) स्त्रीलिंगी, (३) नपुंसकलिंगी अनेकवचनी घातले, तरी क्रियापदांत कोणताच बदल झाला नाहीं. तें नपुंसकलिंगी एकवचनींच राहिलें.
वाक्यांत कर्ता, कर्म याप्रमाणें किंवा स्वतंत्र क्रियापदाची जी योजना असते तिला प्रयोग म्हणतात. प्रयोग तीन प्रकारचे आहेत.
१ ज्या वाक्यांत कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणें क्रियापदाचें लिंगवचन असतें, त्या वाक्यांचा कर्तरिप्रयोग समजावा.
जसें आंबा गोड लागतो. कैरी आंबट असते. मुलगे खो खो खेळतात. मूल धांवतांना पडलें.
२ ज्या वाक्यांत कर्माच्या लिंगवचनाप्रमाणें क्रियापदाचें लिंगवचन असतें त्या वाक्याचा कर्मणि प्रयोग समजावा.
जसें रामानें इतिहास वाचिला. गंगूनें कविता म्हटल्या. येसूनें चित्र काढिलें. मुलांनीं पुस्ती लिहिली.
३ ज्या वाक्यांत क्रियापद कर्त्याच्या अगर कर्माच्या लिंगवचनाप्रमाणें नसून स्वतंत्र नपुंसलकलिंगी एकवचनीं असतें त्या वाक्याचा भावेप्रयोग समजावा.
जसें कृष्णानें कंसास मारिलें. वानरांनीं राक्षसांना मारिलें. बाजीरावानें ब्राह्मणाला बोलाविलें. एकनाथांनीं अंत्यजांत सुखविलें.
(१) कर्तरि प्रयोगांत क्रियापदाला कर्म असलें तर तो सकर्मक कर्तरि व कर्म नसलें तर अकर्मक कर्तरि प्रयोग समजावा. जसें :-
(१) गोविंदा अभ्यास करितो. सकर्मक कर्तरि.
(२) कृष्णा रोज शाळेला जातो. अकर्मक कर्तरि.
(२) कर्मणि प्रयोग कर्म असल्याशिवाय होत नाहीं.
(३) भावे प्रयोगांत क्रियापदाला कर्म असलें तर सकर्मक भावे व कर्म नसलें तर अकर्मक भावे प्रयोग म्हणतात. जसें :-
(१) रामानें आज माझ्याकडे यावें. अकर्मक भावे.
(२) विठूनें वसंतास सिनेमाला न्यावें. सकर्मक भावे.

--------------------------------

इतर माहिती --
(१) रामानें रावणास मारिलें.
(२) गोविंदानें गाय बांधिली.
(३) यमूनें गाईस बांधिलें.
(४) गणूनें दगड फेकिला.
(५) गड्यानें धोब्यास बोलाविलें.
(६) रामूनें घोड्यास आणिलें.
(७) बाईनें म्हैस बांधिली.
(८) विष्णूनें पुस्तक दिलें. या उदाहरणावरून दिसून येईल कीं, कर्म मनुष्यवाचक नाम भावे प्रयोगांत असतें. वाक्य १ व ५ पहा. कर्म प्राणिवाचक नाम असेल तर कर्मणि अगर भावे योग होतो. वाक्य २, ३, ६, ७ पहा. कर्म निर्जीव पदार्थवाचक नाम कर्मनि प्रयोगांत असतें. वाक्य ४ व ८ पहा.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP