( शब्दावरून पदार्थ एक किंवा अनेक आहेत हें कळतें. )
(१) आमचे घरीं स्वारीचा एक घोडा व तांग्याचे दोन घोडे आहेत.
(२) नासलेला एक आंबा बाजूस ठेवा आणि चांगले दोन आंबे घेऊन त्यांचा रस करा.
(३) मला एक छत्री आणि यमू, शकूला दोन छत्र्या लागतील.
(४) चित्रांचें एक पुस्तक मला ठेवा व दुसरें दोन पुस्तकें परत न्या.
घोडा, आंबा, छत्री, पुस्तक या शब्दांवरून दोन पदार्थ असें कळतें आणि घोडे, आंबे, छत्र्या, पुस्तकें या शब्दांवरून दोन पदार्थ असीं समजतें.
दोनापेक्षां जास्त पदार्थ असते तरी, तीन - घोडे; चार - आंबे, पांच - छत्र्या, सहा पुस्तकें असेंच आपण म्हटलें असतें.
घोडा, आंबा, छत्री, पुस्तक या शब्दांत घोडे, आंबे, छत्र्या, पुस्तके असा फरक झाल्यानें आपणांस एकापेक्षां जास्त पदार्थांची कल्पना येते.
शब्दावरून एक किंवा एकापेक्षां जास्त वस्तु आहेत असें आपणांस कळतें त्यास वचन असें म्हणतात.
ज्या शब्दावरून एक वस्तु आहे असें कळतें त्या शब्दाचें एकवचन समजतात. ज्या शब्दावरून एकापेक्षां जास्त वस्तु आहेत असें आपणांस कलतें त्या शब्दाचें अनेकवचन समजतात.
फळा, टेबलें, खुर्च्या, दौतो, दप्तरें, मुलगे, माणसें हे शब्द एकवचनी आहेत. फळें, टेबलें, खुर्च्या, दौती, दप्तरें, मुलगे, माणसें हे शब्द अनेकवचनी आहेत.
१ एकवचन - दगड, खांब, सिंह, वाघ, कागद.
अनेकवचन - दगड, खांब, सिंह, वाघ, कागद.
एक - दगड, दोन दगड; एक खांब, पांच खांब;
एक - कागद, दहा कागद.
२ एकवचन - एक कवि, एक ऋषि, एक मुनि.
अनेकवचन - दोन कवि, चार ऋषि, एक मुनि.
३ एकवचन - एक तेली, एक कोळी, एक साळी.
अनेकवचन - दोन तेली, चार कोळी, नऊ साळी.
४ एकवचन - एक गुरु, एक गडू, एक शत्रु.
अनेकवचन - चार गुरु, सात गडू, सहा शत्रु.
५ एकवचन - एक मासा, एक फळा, एक सदरा, एक डोळा.
अनेकवचन - चार मासे, पांच फळे, तीन सदरे, दोन डोळे.
हे सर्व शब्द पुल्लिंगी आहेत. पहिल्या चार प्रकारच्या उदाहरणांत शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखेंच आहे. मूळ शब्दांत कोणताही बदल झालेला नाहीं. पांचव्या प्रकारच्या शब्दांत मासा - मासे, फळा - फळे याप्रमाणें एकवचनी आणि अनेकवचनी शब्दांत फरक झालेला आहे.
१ एकवचन - भिंत, चूल, केळ ( झाड ), परात, पाल.
अनेकवचन - भिंती, चुली, केळी, पराती, पाली.
२ एकवचन - चिंच, वीट, वेळ चूक.
अनेकवचन - चिंचा, विटा, वेळा, चुका.
३ एकवचन - रीति, मति, गति, शक्ति.
अनेकवचन - रीति, मति गति, शक्ति.
४ एकवचन - धेनु, तनु.
अनेकवचन - धेनु, तनु.
५ एकवचन - भाषा, रेघा, शाळा.
अनेकवचन - भाषा, रेघा, शाळा.
६ एकवचन - पिसूं, सासू, जळूं, ऊं.
अनेकवचन - पिसवा, सासवा, जळवा, उवा.
७ एकवचन - पै, बायका.
अनेकवचन - पया, बायका.
हे सर्व शब्द स्त्रीलिंगी आहेत. त्यांत कोणत्या शब्दाच्या अनेकवचनांत कोणता फरक झाला आहे तें पाहून ठेवा.
१ एकवचन - घर, मूल, फूल, दार, टरबूज.
अनेकवचन - घरें, मुलें, फुलें, दारें, टरबूज.
२ एकवचन - वासरूं, मेंढरूं, करडूं, कोकरूं, लिंबू.
अनेकवचन - वासरें, मेंढरें, करडें, कोंकरें, लिंबें.
३ एकवचन - तळें, लुगडें, पोलकें, केळें ( फळ ), मडकें.
अनेकवचन - तळीं, लुगडीं, पोलकीं, केळीं, मडकीं.
४ एकवचन - दहीं, पाणी, लोणी.
अनेकवचन - दहीं, पाणी, लोणी.
५ एकवचन - तें मोतीं.
अनेकवचन - तीं मोतीं.
हे सर्व शब्द नपुंसकलिंगी आहेत. एकवचनी शब्दांत कोणता बदल होऊन अनेकवचनी शब्द बनला हें ध्यानांत ठेवा.
(१) ते समोरून येणारे गृहस्थ आमचे शिक्षक आहेत.
(२) त्यांच्या बरोबर दिसतात त्या मुलींच्या शाळेच्या मोठ्या बाई
(३) मागून येत आहेत ते आमचे विनायकराव काका. त्यांच्याबरोबर त्या यशोदामावशी.
(४) ते बघा बाबाही आले, आतां हे सर्वजण फिरावयास जातील.
या वाक्यांत ते शिक्शक, त्या बाई, ते विनायकराव, त्या यशोदा मावशी, ते बाबा हे शब्द पहा, एकवचनी आहेत. कारण एक शिक्षक, एक बाई, एक काका, एक मावशी, एक बाबा. परंतु एकाद्याविषयीं आपणांस आदर दाखवावयाचा असेल, एकाद्यास मान द्यावयाचा असेल, तर तो एकटा असला तरी त्याचें अनेकवचन समजतात. त्याला आदरार्थीं बहुवचन म्हणतात.
उदा. दादा आले, वहिनी येतील, शिक्षक गेले, बाई जातील इ. या उदाहरणांवरून लक्षांत येईल कीं, ते हें अक्षर ज्या शब्दामागें जुळेल तो शब्द नपुंसकलिंगीच असतो असें नाहीं. उ. ते बाबा - पुल्लिंगी. तसेंच ते आंबे, मुलगे, आणे हे शब्द पुल्लिंगी अनेकवचनी आहेत; म्हणजे शब्द कोणत्या लिंगी आहे हें ठरवितांना त्याच्या वचनाचाही विचार करावा लागतो. अनेकवचनी शब्दाचें एकवचनी रूप करावें म्हणजे शब्दाचें लिंग समजणें सुलभ होतें. जसें :- तीं कुळें यांत मूळ, तें कूळ नपुंसकलिंग.
--------------------------------------------------
शुद्धलेखन (१)
(१) जशीं फुलें सर्वांस आवडतात, तशीं लहान मुलें सगळ्यांना आवडतात. बागेंट फुलझाडें असलीं म्हणजे बागेला शोभा येते. ज्या घरांत लहान पोरें खेळतात ती घरें सुशोभित दिसतात. फुलांपासूनच पुढें गोड फळें तयार होतात. गोड फळांच्या रुचीनें सगळे खूष होतात. मुलें मोठीं झालीं कीं, तींच माणसें होतात. माणसें परोपकारानें दुसर्यांना आनंदित करितात.
(२) मूल मग तें कसेंही असो, ज्याचें त्याला नेहमींच आवडतें. गाईला आपलें वासरूं दिसलें कीं, आनंद होतो. घोडीला स्वतःचें शिंगरूं भेटलें कीं आनंद होतो. शेळ्यांना आपलीं करडें बागडतांना पाहून तसाच आनंद होतो.
(३) आमच्या गांवाजवळ दोन तळीं आहेत. तळ्यांच्या आसपास कोळी लोक रहातात. ते रोज तळ्यांतील मासे घरण्याचें काम करितात. लहान झोपड्या हींच त्यांचीं घरें. फाटकीं धोतरें व पागोटीं हाच पुरुषांचा पोषाख. जुनीं लुगडीं, फाटक्या चोळ्या यांशिवाय दुसरी वस्त्रें त्यांच्या बायकांना माहीत नाहींत. घरांत पहाल तर गाडगीं, मडकीं यांशिवाय तुम्हांस दुसरीं भांडीं आढळणार नाहींत.
वर दिलेल्या लेखनांत (१) मुलें, फुलें, पोरें, फळें, माणसें.
(२) वासरूं, शिंगरूं, करडें. (३) तळीं, घरें. (४) धोतरें, पागोटी, लुगडीं, वस्त्रें, गाडगीं, मडकीं, भांडीं या शब्दांवर अनुस्वार दिसतात. हे सर्व शब्द नपुंसकलिंगी आहेत.
-------------------------------------------
क् या व्यंजनांत अ स्वर मिळून क हें अक्षर बनलें. आ स्वर मिळविल्याने का हें अक्षर बनलें. याप्रमाणें कि, की, कु, कू इत्यादि अक्षरें बनलीं आहेत, हें आपल्याला माहीत आहेच.
ज्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरांत अ स्वर असतो त्यास अकारांत शब्द म्हणतात. ज्याच्या शेवटच्या अक्षरांत आ स्वर असतो त्यास आकारांत शब्द म्हणतात. याप्रमाणें इकारांत, उकारांत, एकारांत, ओकारांत इ.
शब्दाचे प्रकार आहेत. उदा.
(१) अकारांत - दगड, घर, सून.
(२) आकारांत - मासा, शाळा, चष्मा.
(३) इकारांत - कवि, मुनि, शक्ति.
(४) ईकारांत - नदी, मावशी, तेली.
(५) उकारांत - शत्रु, रिपु, धेनु.
(६) ऊकारांत - तराजू, गडू, कोकरूं.
(७) एकारांत - लुगडें, तळें, बदकें.
(८) ओकारांत - बायको, टाहो ( मोराचें ओरडणें )
(१) घर, मूल, फळ यांसारख्या अकारांत नपुंसकलिंगी शब्दांचें अनेकवचनी रूप घरें, मुलें, फळें असें एकारांत होतें.
(२) वासरूं, करडूं यांसारख्या ऊकारांत, नपुंसकलिंगी शब्दांचें अनेकवचन वासरें, करडें असें एकारांत होतें.
(३) तळें, मडकें, पागोटें अशा एकारांत नपुंसकलिंगी शब्दांचे अनेकवचनी रूप तळीं, मडकीं, पागोटीं असें ईकारांत होतें.
दिलेल्या शुद्धलेखनाचा विचार केला तर नपुंसकलिंगी शब्दांच्या अनुस्वारासंबंधानें पुढें दिल्याप्रमाणें नियम सांगतां येतील.
(१) अकारांत नपुंसकलिंगी शब्दांच्या अनेकवचनी रूपांवर अनुस्वार द्यावा. जसें - झाड - झाडें; पान - पानें; कमळ - कमळें; बोर - बोरें ( फळ ).
(२) उकारांत नपुंसकलिंगी शद्बांच्या एकवचनी व अनेकवचनी रूपांवर अनुस्वार द्यावा. जसें - कोंकरूं - कोंकरें; करडूं - करडें; शिंगारूं - शिंगरें.
(३) एकारांत नपुंसकलिंगी शब्दांच्या दोन्ही वचनी रूपांतर अनुस्वार द्यावा. जसें - तळें - तळीं; लुगडें - लुगडीं; पोलकें - पोलकीं; कारलें - कारलीं.
(४) मोतीं - मोत्यें यासारख्या नपुंसकलिंगी शब्दांवर अनुस्वार द्यावा.
अकारांत एकवचनी व पाणी, लोणी यांसारख्या नपुंसकलिंगी शब्दांवर अनुस्वार देऊं नये. उदा. अंजीर, डाळिंब, जांभूळ इ.