भाद्रपद शुद्ध ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
जिंजीचा वेढा सुरु !
शके १६१२ च्या भाद्रपद शु. ६ रोजी औरंगजेबाचा पराक्रमी सरदार झुल्फिकारखान यानें जिंजीस वेढा घातला. झुल्फिकारखानानें मराठ्यांची राजधानी रायगड घेऊन आधींच पराक्रम केला होता. आणि बादशहाची मर्जी संपादन केली होती. राजमाता येसूबाई व शाहू हे मोंगलांच्या ताब्यांत आले होते तरी राजाराम हातचा निसटलेला होता. तेव्हां त्याचा पाडाव करण्यासाठीं राजारामाचे पाठीवर झुल्फिकारखान निघाला. रायचूर, कर्नूर, नंद्याळ, कडाप्पा या मार्गानें जात जात राजारामाचा पाडाव करण्यासाठी भाद्रपद शु.६ रोजी त्यानें जिंजीस वेढा घातला. या वेळपासून सातआठ वर्षेपर्यंत वेढा चालू होता. मोठी शिकस्त करुन शके १६२० मध्यें जिंजी हस्तगत झाली; पण त्यापूर्वीच राजाराम तेथून निसटला होता. त्यामुळें जिंजी हस्तगत झाली; पण त्यापूर्वीच राजाराम तेथून निसटला होता. त्यामुळें झुल्फिकारखानाचे सारे श्रम व्यर्थ गेल्यासारखे होते. स्वत: झुल्फिकारखान, त्याचा बाप आसदरखान, बादशहाचा पुत्र, नातू आणि मोठी फौज इतक्यांनी फारच परिश्रम केले, पण त्या मानानें बादशहास कांहींच फायदा झाला नाहीं. जिंजीच्या किल्ल्याचा घेर फारच मोठा आहे. कारण तीन मोठे पर्वत मिळून तीन मैलांचा परिघ तयार झाला असून जिंजीचा किल्ला तयार झाला आहे. पश्चिमेकडे राजगिरी, उत्तरेस कृष्णगिरी व दक्षिणेस चांद्रायण दुर्ग अशीं पर्वतांची नांवें आहेत. या अवघड स्थळावर विजय मिळवणें कठीण होतें. झुल्फिकारखानाच्या हातीं फौज त्या मानानें कमी होती. बादशहा तरी आणखी फौज कोठून पाठविणार ? खुद्द महाराष्ट्रात संताजी-धनाजी या जोडीनें चालविलेल्या धुमाकुळीनें औरंगजेब आधींच त्रस्त झाला होता. शेवटीं महाराष्ट्रांतील बंडाळी थांबविण्यास जिजे अगोदर हस्तगत झाली पाहिजे असा विचार बादशहानें केला व त्यानें आपला मुलगा कामबक्ष यास मदत म्हणून जिजीकडे पाठविले. त्यामुळें झालें उलटेंच. आतां वेढयाचें नायकत्व कामबक्षाकडे जाणार म्हणून झुल्फिकारखान, व त्याचा बाप आसदखान हे दोघे नाराज झाले; आणि त्यामुळें वेढ्याचें काम रेंगाळतच चालू झालें.
- २९ आँगस्ट १६९०
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP