भाद्रपद शुद्ध १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
जतींद्रनाथांचा प्राणत्याग !
शके १८५१ च्या भाद्रपद शु. १० या दिवशीं लाहोरच्या कटांतील सुप्रसिद्ध आरोपी जतींद्रनाथ दास यांनीं तुरुंगातील जुलमाचा निषेध करण्यासाठी त्रेसष्ट दिवसांचे उपोषण करुन प्राणत्याग केला. जतींद्रांचा जन्म शके १८२६ मध्यें कलकत्यास झाला. मँट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर यांनी आशुतोष काँलेजमध्यें प्रवेश केला. पण पुढें देशभक्तीनें प्रेरित होऊन यांनी काँलेज सोडून राजकारण करण्यास सुरुवात केली. कायदेभंगाबद्दल जतींद्रांना तीन वेळां शिक्षा झाली. त्यानंतर ‘दक्षिण कलकत्ता तरुण समिति’ काढून राजकीय कार्यास यांनीं आरंभ केला. तेव्हां बेंगाँल आँर्डिनन्स कायद्यान्वयें यांना तुरुंगांत जाणें भाग पडलें. तेथें यांचा अत्यंत छळ झाला. त्याचा निषेध म्हणून यांनीं तेवीस दिवसांचें उपोषण केल्यावर यांची मुक्तता झाली. त्यानंतर सन १९२९ मध्ये लाहोर कटांत सामील असल्याचा आरोप यांच्यावर आला आणि त्यामुळें त्यांना पकडण्यांत आलें. हिंदी कैद्यांना तुरुंगांतील वागणूक अत्यंत वाईट मिळत असे. ती सुधारावी म्हणून यांनीं कांहीं उपाय योजण्याचें ठरविलें. यांचे सहकारी भगतसिंग व दत्त यांना तुरुंगांत हालअपेष्टा भोगाव्या लागत होत्या. त्यांना सहानुभूति दाखविण्यासाठीं जतींद्रांनीं अन्नसत्याग्रह सुरु केला. सक्तीनें अन्न घालण्याच्या प्रयत्नांत अधिकार्यांना यश आलें नाहीं. आणि याच प्रायोपवेशनांत भाद्रपद शु. १० रोजी जतींद्रांचा अंत झाला. या भीषण प्रकारामुळें स्वदेशी आणि परदेशीं एकच खळबळ उडाली. प्रसिद्ध आयरिश देशभक्त टेरेन्स मँक्स्विनीच्या पत्नीनें त्यास याच उपायाचा संदेश पाठविला होता. या प्रसंगाची स्मृति सर्वांना झाली. देशासाठी प्राणपणानें लढणार्या क्रांतिकारकांना सन्मानानें वागवावें, खुनी दरोडेखोरांप्रमाणें त्यांचा दर्जा ठेवूं नये, या तत्वासाठीं जो झगडा भगतसिंग आदि क्रांतिवीरांनीं केला, त्याचीच उज्ज्वल परंपरा जतींद्रदासांनीं राखली. स्वत:च्या प्राणत्यागानें क्रांतिकारकांना सहानुभूति दाखविणारा हा वीर त्या वेळीं लोकांना आदरणीयच वाटला.
- १३ सप्टेंबर १९२९
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP