भाद्रपद शुद्ध ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
तुकोजी होळकरांचे निधन !
शके १७१९ च्या भाद्रपद शु. ८ रोजी प्रसिद्ध पुरुष तुकोजीराव होळकर यांचे निधन झालें. होळकरांच्या घराण्यांतील जानोजीचे हे चिरंजीव. तुकोजी कागदोपत्रांत व शिक्यांत आपणा स्वत:स मल्हारराव होळकरांचा दत्तक पुत्र समजतो, पंतु प्रत्यक्ष दत्तविधान झालेले नव्हतें. अहल्याबाईनें होळकरांच्या दौलतीचा बंदोबस्त पाहावा आणि तुकोजीनें सेनापति होऊन मराठी राज्याची इतर कामगिरी पार पाडावी अशी व्यवस्था होती. सन १७६९ पासून तुकोजी महादजी शिंदे याच्याबरोबर दिल्लीकडे होता. पुढें पांच वर्षांनी दक्षिणेंत येऊन यानें राघोबादादांचा पक्ष स्वीकारला. त्यानंतर म्रोरोबादादांना साह्य करण्यास हा तत्पर झालेला असतांना महादजींनी याला नाना फडणीस यांचे बाजूस घेतलें. सन १७७८ मध्यें तुकोजी, हरिपंत फडके व महादजी शिंदे यांचे बरोबर इंग्रजांशीं लढण्यास गेला होता. त्या वेळीं बोरघाटांत झालेल्या लढाईत हा सेनापति म्हणून काम पहात होता. सन १७८६ मधील टिपूवरील लढाईत तर तुकोजीनें चांगलाच पराक्रम केला. त्यानंतर शिंदे यांच्यावर ताण करण्यासाठीं ड्य़ुड्रनेक या फ्रेंच अधिकार्याच्या हाताखालीं यानें कवायती फौज उभी केली; पुढें शिंदे-होळकरांचे वैमनस्य वाढतच जाऊन दोघांची लढाई लाखेरी येथे झाली. व तींत तुकोजीचा पराभव होऊन मराठेशाहीचा दर्जा खालावण्यास सुरवात झाली. शेवटीं याला अर्धांगवायु झाला, परंतु पेशव्यांच्या आग्रहावरुन खर्ड्याच्या लढाईंत याला जावें लागलें. त्यानंतर भाद्रपद शु.८ रोजीं तुकोजीचा अंत झाला. तुकोजी होळकराला स्वतंत्रपणे कारभार करण्याची संधि मिळाली नाहीं. आणि त्याला तें जमलेंहि नाहीं. तुकोजीचा वडील मुलगा काशीराव हा शरिरानें अधू होता व धाकटा मल्हारराव उनाड होता; यशवंतराव व विठोजी हे याचे दासीपुत्र होत. तुकोजीच्या निधनानंतरच्या पत्रांत " मोठा पुरुष गेला. ऐसा गरीबनवा गरीबगुरिबांचे चालवणार पुरुष विरळा" असा मजकूर सांपडतो.
-२९ आँगस्ट १७९७
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP