भाद्रपद वद्य ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


दक्षिणेंतील स्वातंत्र्य-समराचा अस्त !

शके १७७९ च्या भाद्रपद व. ५ रोजीं सत्तावनच्या क्रांतियुगांत भाग घेणार्‍या दक्षिण महाराष्ट्रांतील अठरा जणांना सातारा येथील गेंड्यांच्या माळावर फाशीं देण्यांत आलें. त्यांत रंगो बापूजींचा मुलगा सीताराम व इतर नातेवाईकहि होते. सन १८५७ मध्यें उत्तर हिंदुस्थानांत स्वातंत्र्ययुद्धाच्या भयंकर ज्वाला भडकल्या होत्या. त्याची झळ महाराष्ट्रालाहि लागल्यावांचून राहिली नाहीं. सातारचे राजे प्रतापसिंह हालअपेष्टांत मृत्यु पावले, त्यांच्या बंधूंचा अंत होतांच सातारचें राज्यहि खालसा झालें, चौदा वर्षे इंग्लंडमध्यें धन्यास न्याय मिळावा म्हणून जीव तोडून श्रम करणार्‍या रंगो बापूजींत न्याय मिळण्याच्या बाबतींत अपयश येऊन ते महाराष्ट्रांत आले होते. या परिस्थितींत सर्वच असंतोष धुमसत होता. रंगोबांनीं पुन्हा बरीच हालचाल केली. उत्तर हिंदुस्थानांत जाऊन त्यांनी नानासाहेबांची गांठ घेतली. "माझ्याजवळचे हजार गडी नि माझे दोन पुतणे तुमचा निरोप येतांच इकडे रवाना करतों, उत्तरेकडे पंचारतीचा गजर झालेला ऐकूं येतांच, दक्षिणेंत मी नौबदीवर टिपरी हाणतों" असें आश्वासन रंगोबांनी नानासाहेबांना दिलें. दक्षिणेंतील सार्‍या उठावाची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. ३१ जुलैला पेटलेली क्रांतीची ज्योत धूर्त इंग्रजानें ताबडतोब विझविली. फंदफितुरीचा सुळसुळाट झाला होता. रंगो बापूजी रत्नागिरीच्या किल्ल्यांत अडकले गेले. त्यांचा मुलगा सीताराम व इतर आप्तगण इंग्रजांच्या हातीं आले. प्रचंड उत्थानाचा पुरावा उघडकीस आला. भाद्रपद व. ५ रोजी सीताराम गुप्ते (रंबोबांचे चिरंजीव), बेळगांवच्या शिपायांचा पुढारी ठाकुरसिंग, मुनशी, सावंतवाडीचा रामजी शिरसाळ, इत्यादि अठरा पुढार्‍यांना सातारा येथें इंग्रजी राजसत्तेनें फांशी दिलें. हा ‘समारंभ’ पाहण्यासाठी खेड्यापाड्यांतून हजारों लोकांना मुद्दाम आणलें होतें. कटवाल्यांचे पुढारी रंगो बापूजी वस्ताद होते. त्यांनी तुरुंगातून पोबारा केला. इंग्रजांनीं शोधाची शर्थ केली पण बहादुर सांपडला नाहीं. त्यांच्या मृत्यु कोठें झाला, कशानें झाला, हें एक गूढच आहे.
- ८ सप्टेंबर १७५७

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP