भाद्रपद शुद्ध १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) पंधरा हजार स्त्रियांचा जोहार !
शके १२२५ च्या भाद्रपद शु. १४ या दिवशी चितोडगडावर पंधरा हजार रजपूत स्त्रियांनी इस्लामी विटंबनेपासून मुक्त व्हावें यासाठीं जोहार करुन आत्मबलिदान केलें. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस आपल्या चुलत्याला कपटानें मारुन अल्लाउद्दिन दिल्लीच्या गादीवर बसला. या जुलमी आणि अत्याचारी सुलतानानें असंख्य भारतीय राजांचे मुकुट धुळीस मिळविले. मेवाडचा आदित्यध्वज मात्र चितोडगडावर गौरवानें तळपत होता. त्या देशाची स्वामिनी पद्मिनी आपल्या सौंदर्यानें शोभत होती. हें लावण्यकमल रुक्ष अशा राजस्थानांत असण्यापेक्षां दिल्लीच्या पातशाही वाड्यांत अधिक खुलून दिसेल, अशा उन्मादानें वेडावून मेवाडचा अधिपति रत्नसिंह मारला गेला तेव्हां वृद्ध लक्मणसिंह सेनापति झाला आणि आपल्या सातहि पुत्रांसहित त्यानें मातृभूमीच्या संरक्षणासाठी सुरु असलेल्या यज्ञकुंडांत आपले बळी दिले. शूरवीरांचें हे आत्मसमर्पण होण्यापूर्वी चितोडगडावर दुसरें एक दिव्य पार पडलें. चितोड्या सर्वनाश होण्यापूर्वी, या सर्व वीरांगनांनीं आपल्या पतींच्या आधीं स्वर्गाची वाट धरली. या प्रसंगाचें टाँडनें वर्णन केलें आहे : "पंधरा हजार राजपुतिनी चिडोडगडावर एकत्र जमल्या. पद्मिनीसह मंगल सुवासिनींचा पोषाख चढवून सर्व जणी तळघरांत शिरल्या. तेथें सर्व प्रकारचे ज्वालाग्राही पदार्थ भरलेले होते. सौंदर्यराणी पद्मिनीच्या सभोंवार बसून सौभाग्याची मंगल गीतें गाणार्या त्या सर्व राजपुतिनींच्या शीलसंरक्षणार्थ राजपूत वीरांनी स्वहस्तें त्या तळघरास अग्नि लाविला, आणि स्वत: एकलिंगजीचा जयघोष करीत ते सर्व यवनसैन्यावर तुटून पडले. थोड्याच वेळांत चितोड अल्लाउद्दिनाच्या स्वाधीन झाला. पण तेथें काय होते ? चितोडचें एक कुत्रेंहि पारतंत्र्यांत राहावयास तयार नव्हतें. दगड, विटा व माती यांनी भरलेला तो निर्जीव गड पाहून क्रूर अल्लाउद्दिनाचें काळीज थरारलें. पंधरा हजार स्त्रियांच्या जोहाराचें तें भयंकर दृश्य पाहून त्याची दृष्टि क्षणभर अंध झाली."
- २६ आँगस्ट १३०३
---------------------
(२) राममोहन राँय यांचे निधन !
शके १७५५ च्या भाद्रपद शु. १४ या दिवशीं भारतांतील पहिले समाजसुधारक, ब्राह्म समाजाचे संस्थापक, राजकारणी मुत्सद्दी व नवयुगप्रवर्तक, राजा राममोहन राँय यांचें निधन झालें. हुगळी जिल्ह्यांतील राधानगर या गांवी शके १६९४ सालीं यांचा जन्म झाला. यांच्या पित्याचें नांव रमाकान्त असून आईचें नांव तारिणीदेवी असें होतें. राममोहनांनीं पाटणा येथें राहून अरबी व फारसी भाषांचा चांगला अभ्यास केला. त्यामुळें यांच्यावर सूफी मताचा परिणाम होऊन यांचे विचार मूर्तिपूजेच्या विरुद्ध बनूं लागले. यांच्या सुधारकी मतांमुळें अनेक वेळां यांना घराबाहेर पडण्याचे प्रसंग आले. घराबाहेर पडल्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी हे हिमालयांतून पायीं तिबेटमध्यें गेले. पण तेथें तर मूर्तिपूजेचें विकृत दर्शनच त्यांना झालें. तेथून परत आल्यावर काशी येथें राहून यांनी धर्मशास्त्र व संस्कृत विद्या यांच्या अध्ययनांत बरेच दिवस खर्च केले. त्यानंतर त्यांचा ‘तुहफत-उल् मुवाहउद्दीन’ (एकेश्वरीवाद्यास देणगी) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. पुढें हे कलकत्ता येथें आले आणि सन १८१५ मध्यें आत्मीय सभा स्थापन करुन त्यांनीं धर्मचर्चा सुरु केली; आणि त्यासाठी उपनिषदांची भाषांतरें बंगाली, इंग्रजी व हिंदी भाषांतून यांनीच प्रसिद्ध केलीं. सन १८१८ मध्यें सती जाण्याविरुद्ध चळवळ करुन तसा कायदा करण्यास यांनीं मोठीच मदत केली. नवविचारांनी भारलेल्या राममोहनांनी स्वत: पैसा खर्च करुन एक हिंदु काँलेज काढून भौतिक ज्ञानाच्या प्रतिपादनाचा पुरस्कार केला. जुन्या तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठीं यांचे एक वेदान्त काँलेजहि निघालें. सन १८२८ मध्यें शिक्षण, सुधारणा, मूर्तिपूजाविरोध, एकेश्वरवाद या सर्वांवर आधारलेला व हिंदु संस्कृतीचा पुरस्कार करणारा ब्राह्म समाज यांनीं काढला. कांही राजकीय कामासाठीं हे सन १८३१ मध्यें इंग्लंडला गेले. तिकडेच ब्रिस्टल येथें युरोपियन स्त्रीपुरुषांच्या सहवासांत यांचा अंत झाला. अनेक प्रकारचीं नियत यांचा अंत झाला. अनेक प्रकारचीं नियतकालिकें चालवून यांनीं सुधारणा केली. बंगाली आद्य प्रवर्तक म्हणून यांचें नांव विख्यात आहे.
- २७ सप्टेंबर १८३३
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP