भाद्रपद वद्य ३०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
मुरार जगदेवांची सुवर्णतुला !
शके १५५५ च्या भाद्रपद व. ३० रोजीं ‘महाराज राजाधिराज मुरारपंडित’ उर्फ मुरार जगदेव यांनीं सूर्यग्रहणानिमित्त तुळापूर येथें सुवर्णतुला करुन गांव अग्रहार दिला. या वेळीं शहाजी राजे तिसर्या मूर्तझा निजामच्या नांवानें राज्यकारभार पाहत होते. विजापूरचा सरदार जगदेव शहाजीला मान्यता देण्यासाठीं विजापूरकरांची फौज शहाजीच्या मदतीस ठेवून हा परत विजापुरास निघाला. मध्येंच भीमा-इंद्रायणीच्या संगमावर शहाजी व मुरारजी यांचा मुक्काम पडला. त्या दिवशीं सूर्यग्रहण होतें. हा उत्तम पर्वकाळ साधावा म्हणून मुरार जगदेवांनी आपली सुवर्णतुला दान केली. या प्रसंगीं हत्तीची तुला कशी करावी, हा प्रश्न निर्माण झाला. कोणाचीहि बुद्धि चालेना. शेवटीं शहाजी राजांनी युक्ति सुचविली. हत्ती नावेंत घालावा; आणि त्या खुणेपर्यंत नांव बुडली म्हणजे हत्तीची तुला झाली. राजांच्या या कल्पनेवर मुरार जगदेव खुष झाले. मुरारजींनीं आपली सुवर्णतुला केल्यानंतर त्या गांवचे मूळचें नांव नागरगांव बदलून तुळापूर असें ठेविलें व तीनशें होनांची जमीन सोळा ब्राह्मणांना अग्रहार दिली. या प्रसंगाचें दान-पत्र प्रसिद्ध असून त्यांत सोळा ब्राह्मणांचीं नांवेंहि दिलीं आहेत. या दानपत्रांत मुरार जगदेवासबंधीं असें म्हटलें आहे : "संसारतापतप्त. विबुधजन: धर्मावतांरराजाधिराज: महाराज: राजश्री: पंडित: जगदेकप्रभु: सार्वभौमप्रतिनिधि: ।" यावरुन मुरार जगदेवाचा त्या वेळचा दर्जा ध्यानांत येतो. मुरारजी हे ब्राह्मण असून आदिलशाहींतील मुख्य वजिराचे कारभारी होते. परकीयांची चाकरी करण्यांतच यांचे सारें आयुष्य गेलें. त्या कालीं तेंच मोठेपणाचे गमक असे. यांनीं "पुणे कसबावसती जाळून तेथें गाढवांचा नांगर फिरविला, पुण्याचा कोट पाडून शहाजीचे वाडे जाळले व लूट केली आणि भुलेश्वरावर ‘दौलत मंगल’ किल्ला बांधून तेथून पुणें प्रांतावर आदिलशाहीचा अमल सुरु केला."
- २३ सप्टेंबर १६३३
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP