भाद्रपद वद्य २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
धारवाडास मराठ्यांचा वेढा !
शके १६७६ च्या भाद्रपद व. २ रोजीं माधवराव पेशवे यांनीं हैदरविरुद्ध पुकारलेल्या युद्धांतील मुख्य ठाणें धारवाड यास वेढा दिला ! माधवरावांचे लक्ष उत्तरेकडे फारसें नव्हतें. दक्षिण देशचें राजकारण मात्र त्यांनी चांगलेच केलें. त्यांच्या एकंदर पांच स्वार्या कर्नाटकांत झाल्या. त्यांपैकी पहिल्या चारांत तो स्वत: हजर होता. पहिल्या स्वारींत धारवाडपासून तुंगभद्रेपर्यंत तो फक्त खंडण्या घेऊन आला. दुसर्या या स्वारींत तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश मराठ्यांना मिळाला. सावनूर, धारवाड, रट्टेहळ्ळी, हावेरी, अनवडी येथें प्रचंड संग्राम झाले. मराठ्यांचा पानपतवर नुकताच मोठा संहार झालेला पाहून मराठ्यांच्या शत्रूंचें चांगलेंच फावलें. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मराठ्यांचा सर्व अमल हैदरअल्लीनें उठवून लावला. शिरे, होसल, कोटें, बाळापूर, इत्यादि मराठ्यांचे मुख्य प्रांत त्यानें बळकावले. रामदुर्ग, हरपनहळ्ळी व चित्रदुर्ग येथील मराठ्यांच्या मांडलिकांना जिंकिलें. मराठ्यांना हैदरचे प्रताप समजत होते; आणि राक्षसभुवनाचा संग्राम संपल्याबरोबर माधवरावानें कर्नाटकाचेंच काम हातीं घेतलें. पंधरा हजार हुजरात व इतर जहागिरदारांची फौज मिळून एकंदर चाळीस हजार सैन्य खडें झालें. सावनूरकर नवाब व गुत्तीचा मुरारराव घोरपडे हे येऊन मिळाल्यावर ती फौज सत्तर हजारांपर्यंत वाढली. तुंगभद्रेअलीकडचीं सर्व ठाणी माधवरावानें सोडवलीं. चित्रदुर्ग, हरपनहळ्ळी येथून खंडणी वसूल केली. रट्टेहळ्ळीजवळ हैदरचा प्रचंड पराभव केला. धारवाड हें हैदरचे मुख्य ठाणें होतें; त्यालाच भाद्रपद व. २ रोजीं माधवरावानें वेढा घातला. "किल्ला मातबर. दुहेरी कट, दोन खंदक, आंत दारु व गोळी नाहीशी झाली; त्यामुळें तहास आले आणि सलुरवावर घातले. अबरुनें पार करुन देणें, म्हणून गोपाळराव पटवर्धनास आणून त्याच्यामार्फत किल्ला खालीं करविला. हत्यार व वस्तभावसुद्धां बाहेर काढून दिले. नारो त्रिंबक एकबोटे यांनी विशेष पराक्रम केल्यामुळें त्यांस श्रीमंतांनी पालखी दिली." याप्रमाणें दोनअडीच महिने काम चालून कार्तिक शु. १२ रोजीं धारवाड मराठ्यांच्या हातांत आलें.
- १७ सप्टेंबर १७६४
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP