भाद्रपद शुद्ध ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
मुन्शी प्रेमचंद यांचें निधन !
शके १८५८ च्या भाद्रपद शु. ९ रोजीं हिंदी भाषेंतील सर्वश्रेष्ठ उपन्यासकार व लघुकथालेखक प्रेमचंद यांचे निधन झालें. मुनशी धपतराय व आनन्दीदेवी दाम्पत्याच्या पोटीं प्रेमचंदांचा जन्म बनारसजवळील लमही नांवाच्या गावीं शके १८०२ सालीं झाला. प्रेमचंदांचें शिक्षण गोरखपूर, बनारस, अलाहाबाद, इत्यादि ठिकाणीं झालें. एम.ए. पर्यंतचा अभ्यास झाल्यानंतर शाळेंत शिक्षक, मुख्याध्यापक, डेप्युटी इन्स्पेक्टर, इत्यादि विविध प्रकारचीं कामें करुन असहकारितेच्या काळांत यांनीं सरकारी नोकरी सोडून दिली. सन १९०५ मध्ये यांची ‘कृष्णा’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर उत्तरोत्तर त्यांचा लौकिक वाढतच गेला. हुबेहुब व्यक्ति चित्रण करण्यांत प्रेमचंद अत्यंत यशस्वी झाले. ‘सेवासदन’, ‘निर्मला’, ‘गबन’, ‘प्रेमाश्रम’, ‘रंगभूमी’, ‘कायाकल्प’ ‘कर्मभूमि’, ‘गोदान’ या त्यांच्या कलाकृति आहेत. यांखेरीज अनेक उत्कृष्ट लघुकथा यांनी लिहिल्या आहेत. "प्रेमचंदांच्या कादंबर्यातील सर्वांत मोठा गुण हा आहे कीं, त्या वाचकांच्या अंत:करणाचा ठाव घेऊन त्याला विचाराची नवी दिशा दाखवितात. प्रचलित प्रश्न लघुकथेच्या द्वारां मांडून त्यावर नवा प्रकाश टाकण्याची त्यांच्या लेखणींत विलक्षण शक्ति आहे. जीवनांत नित्य अनुभवास येणार्या सुखदु:खादि द्वंद्वाचें यथार्थ चित्रण करणारा याच्यासारखा दुसरा लेखक विरळा." प्रेमचंदांच्या कलाकृतीचा अनुवाद इतर देशी भाषांतून झाला आहेच पण जपानी, इंग्रजी वगैरे भाषातूनहि यांच्या कथांची भाषांतरें झाली आहेत. भारताच्या शेतकर्याचे त्यांतील नायक होरीराम आणि नायिका धनिया या व्यक्तिरेखा हिंदी उपन्याससृष्टींत अमर होऊन राहिल्या आहेत. प्रेमचंदांच्या पुनर्विवाहित पत्नी शिवरानीदेवी यांनीं ‘प्रेमचंद : घरमें’ नांवाचा ग्रंथ यांच्या मृत्यूनंतर लिहिला आहे. त्यांत प्रेमचंदाचें घरगुती जीवन चित्रित करण्यांत आलें आहे.
- २५ आँगस्ट १९३६
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP