भाद्रपद वद्य ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
कवि दासोपंत यांचा जन्म !
शके १४७३ च्या भाद्रपद व. ८ रोजी मराठीमध्यें अफाट कवितासमुद्र निर्माण करणारे कवि दासोपंत देशपांडे यांचा जन्म झाला. बिदरच्या बहामनी पातशाहींतील नारायणगांवी राहणार्या दिगंबरपंत देशपांड्यांचे दासोपंत हे चिरंजीव. यांची परंपरा नाथसंप्रदायी असली तरी उपासना मात्र दत्ताची होती. संस्कृत आणि प्राकृत या दोनहि भाषांमध्यें यांचें पांडित्य दिसून येई. गीतेवरील यांचा ‘गीतार्णव’ नांवाचा अति प्रचंड ग्रंथ आहे. ‘दासोपंती केला गीतार्णव मानवा सवालाख’ असें त्यासंबंधीं मोरोपंतांनीं म्हटलें आहे. तत्कालीन यवन राजसत्तेस न जुमानतां मोठ्या अभिमानानें स्वत्व सांभाळून सासोपंतांनीं साठसत्तर ग्रंथांचीं रचना मराठींत केली आहे. ‘गीतार्थबोध’, ‘ग्रंथराज’,‘पंचीकरण, ‘दत्तात्रेयमाहात्म्य’, ‘अवधूतगीता’, ‘शिवस्तोत्र’, ‘भक्तिराजकवच’, आदि किती तरी ग्रंथ यांचे प्रसिद्ध आहेत. असें सांगतात कीं, यांना रोज एक ढबू पैशाची शाईअ लागत असे. यांच्या प्रसिद्ध अशा गीतार्णवाबद्दल कै. ल.रा. पांगारकर लिहितात, "याच्या पहिल्या अध्यायाच्या ओव्या ३१३३ असून दुसर्या अध्यायाच्या ओव्या ५६५५ आहेत. सव्वा लाख ओवींपकीं सुमारें तेरा हजार ओवी छापली गेली आहे ..... हा ग्रंथ असा अफाट असला तरी अगदीं सुबोध, शुद्ध मराठींत लिहिलेला व चटकदार आहे. पाण्याच्या ओघाबरोबरच फूल जसें सर्कन् वाहून जातें. त्याप्रमाणें वाचक एकदां वाचायला लागला कीं ग्रंथाच्या ओघाबरोबरच सहजरीत्या वाहवला जातो. ग्रंथकार अत्यंत विद्वान व वेदान्तवेत्ते होते यांत शंका नाहीं पण त्यांनी गीतेचा विषयहि शास्त्रीय परिपाठी बाजूला ठेवून निव्वळ मराठी माणसाला वाचतां वाचतां सहज समजावा इतका सुबोध केला आहे .... नाथांच्या वेळचा कोणताच ग्रंथ इतका बालबोध नाहीं. " यांच्या ‘ग्रंथराज’ ग्रंथांत अध्यात्मविषय खुलासेवार सांगितला आहे. याशिवाय दासोपंतांचीं स्फुट पदेंहि अत्यंत मधुर अशींच आहेत. त्यांच्या निर्मल अंत:करणाचें प्रतिबिंब त्यांच्या पदांत स्पष्ट पडलें आहे.
- २४ सप्टेंबर १५५१
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP