भाद्रपद वद्य ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
परशुरामभाऊ पटवर्धनांचे निधन !
शके १७२१ च्या भाद्रपद व. ४ रोजीं माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीतील मराठी सेनापति परशुरामभाऊ पटवर्धन यांचें निधन झालें. शके १६६१ मध्यें परशुरामभाऊ पटवर्धन याचा जन्म झाला. यांचे वडील रामचंद्रपंत पटवर्धन पेशव्यांकडे फडणीस म्हणून असत. वडिलांचेंच पथक परशुरामभाऊंकडे आल्यावर सावनूरच्या मोहिमेंत हे प्रथम लढाईवर गेले. हैदराबरील युद्धांत यांचीं एकामागून एक अशी तीन घोडीं मरुन गेलीं. तरीसुद्धा यांनी मोठा पराक्रम गाजवून हैदरचा पराभव केला. तेव्हां पेशवे यांनीं परशुरामभाऊ यांना वीस हजारांची तैनात दिली. सन १७८१ मध्यें इंग्रज सेनापतींशी यांनी एक लढा दिला. सेनापति गाँडर्ड हा बोरघाट काबीज करुन खोपोली येथें येऊन राहिला होता. या वेळी परशुरामभाऊ कोंकणांत उतरुन गाँर्डनच्या फौजेस अतिशय त्रास देऊं लागले, शेवटी इंग्रजांचें मुंबईशी असलेले दळणवळण बंद पाडून त्यांनी गाँर्डनचा पुरता मोड केला. खर्ड्याच्या प्रसिद्ध लढाईत हेच मुख्य सेनापति होते. "मराठेशाहींत व विशेषत: पेशवे यांच्या कारभाराचें हृद्गत ओळखून आत्मिक भावनेनें तिचा पुरस्कार करणारा भाऊसारखा दुसरा इसम झाला नाहीं. हा कांहीसा ठेंगणा, सावळ्या वर्णाचा व पुष्ट होता. शौर्याबद्दल याची विशेष ख्याति होती. याचे काळेभोर डोळे व उत्साहपूर्ण चर्या पाहतांच याच्या शौर्यादि गुणांची एकदम ओळख पटे. कारस्थानांपेक्षां लडवय्या म्हणवून घेण्याची याला विशेष हौस असे. टिपूच्या विरुद्ध मराठ्यांच्या बाजूनें यानें बरीच कामगिरी केली. परशुरामभाऊ व हरिपंत हे दोघे वाटेल त्या संकटांत नानाकडे धांवत येऊन त्याची कामगिरी जिवास जीव देऊन ताबडतोब उठवीत; म्हणूनच नानाचा कारभार उरके -" यांच्याविषयी बाजीरावाचा अभिप्राय असा आहे : -"भाऊंस नानांनी मजकडे जुन्नरास पाठविलें तेव्हां त्यांस पाहून बहुत संतोष झाला, आधीं भाऊ वृद्ध, त्यांतून एकवचनी, जितेंद्रिय, कुटुंबवत्सल आणि प्रसन्नवदन पाहोन त्यांचे पायावर मस्तक ठेवला आणि वडिलांचे जागीं त्यांस मानून मी व चिमण्या असे त्यांजबरोबर खडकीचे मुक्कामास आलों."
- १७ सप्टेंबर १७९९
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP