कार्तिक शुद्ध ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"याला म्हणतात सती जाणें ! "
शके १८३६ च्या कार्तिक शु. ४ रोजीं दिल्ली-कटामुळें फांशी गेलेले बालमुकुंद यांची पत्नी रामरखी हिनें पतिदेवाला भेटण्यासाठीं स्वर्गारोहण केलें. विख्यात देशभक्त भाई परमानंद यांचे चुलतबंधु म्हणजे बालमुकुंद. यांचे घराणेंच हुतात्म्याचें होतें. परमानंदांच्या घराण्यानें मोठाच अलौकिक त्याग केला आहे. त्यांचे पूर्वज मतिदास औरंगजेबाच्या क्रोधाला बळी पडून डोक्यापासून खालपर्यंत करवतीनें कापले गेले होते ! दिल्लीच्या कटांत सामील झाल्यामुळें बालमुकुंदांना फांशीची शिक्षा आली. एक वर्षापूर्वीच त्यांचे लग्न एका सुंदर मुलीशीं झाले होतें. त्या मुलीचें नांव रामरखी असून विवाहानंतर तिला सासरीं लज्जावती म्हणूं लागले. बालमुकुंदांच्या शेवटच्या सहवासाचें हिनें अत्यंत करुणरम्य असें सांगितलेलें निवेदन प्रसिद्ध आहे. खटला चालला असतांना निर्णयाकडे डोळे लावून ही नवविवाहिता बसली होती. बालमुकुंदांना फांशीची शिक्षा झाली ! अंतिम दर्शनाच्या वेळीं बालमुकुंद आपल्या पत्नीस बोलले, "प्राणप्रिये, जो प्राणी जन्माला आला त्याला केव्हां ना केव्हां तरी मरण आहेच; मी देशहिताकरितां आहुति देत आहें हें तुझें भाग्यच समज." आश्विन व. १ रोजीं बालमुकुंद फांशी गेले. त्यांचे प्रेत अधिकार्यांनी आप्तांच्या ताब्यांत दिलें नाहीं. पंधरा दिवस रामरखी व्रतस्थ होती. अन्नाचा कण कीं पाण्याचा थेंब तोंडांत गेलेल नव्हता. "- एका स्थलावर बसून ज्या मूर्तीचे ध्यान ती करीत होती त्या मूर्तीत तिचें मन स्थिरावूं लागलें. तिनें तपस्या पूर्ण केली. अंतिम दिवशीं सूर्यबिंब पूर्ण तेजानें प्रकाशत होतें. लज्ज्वावतीनें स्वच्छ पाण्यानें स्नान केलें. शुभ्र वस्त्र परिधान केलें. आणि ध्यानस्थानीं अंग टाकून ती बोलली, ‘प्रिया, मी आतां तुमच्या भेटीस येणारच.’ यानंतर प्राण खेचून घेऊन तिनें देहत्याग केला. इच्छापूर्वक देह सोडला. साध्वी लज्ज्वावतीनें देशभक्त हुतात्मा पति बालमुकुंदांशी एकरुप होण्यासाठी परलोकचें देवद्वार स्वेच्छाबलानें उघडून स्वर्गांत प्रवेश केला. याला म्हणतात सती जाणें -"
- २२ आँक्टोबर १९१४
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP