कार्तिक शुद्ध ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


महाराजा रणजितसिंगांचा जन्म !

शके १७०२ च्या कार्तिक शु. ६ ला महापराक्रमी राणा रणजितसिंग यांचा जन्म झाला. पंजाबांतील शीख लोकांचा हा राजा होता. महासिंगानंतर वयाच्या तेराव्या वर्षी हा गादीवर आला. याच्या शौर्यामुळें सर्व शीख राजांचें आधिपत्य याच्याकडे आलें व १८०२ सालीं अमृतसर जिंकून यमुनेपर्यंत विस्तार व्हावा म्हणून यानें खटपट चालविली. इंग्रजांसही याची भीति वाटूं लागली. चाळीस वर्षे अतोनात श्रम करुन राणा रणजितसिंगानें शीख लोकांत लष्करी सामर्थ्य निर्माण केलें. तो फार शूर व युद्धशास्त्रांतील चांगला जाणता होता. त्यानें शीख सैनिकांमध्यें उत्तम पायदळ, सुव्यवस्थित घोडदळ व चांगला तोफखाना यांची भर घातली. वेंचुरा, अलार्ड, व अँव्हिटेबिलो हे याचे तीन सेनापति प्रसिद्ध नेपोलियनच्या हाताखालीं शिक्षण घेतलेले होते. रणजितसिंगानें सर्व अफगाणिस्थान जिंकलें होतें. रणजितसिंग स्वत: निरक्षर असला तरी निरनिराळ्या भाषांतील उत्तमोत्तम काव्यग्रंथ ऐकण्याचा नाद त्याला चांगलाच होता. त्यायोगें त्याचा बुद्धिविकास चांगला झाला. प्रत्येक गोष्टींत तो अत्यंत बारीकपणानें लक्ष ठेवीत असे. त्याची स्मरणशक्ति तीव्र असल्यामुळें आयुष्यांतील सर्व घटना तो बिनचूक रीतीनें तारीखवार सांगत असे. रणजितसिंह मोठा महत्वाकांक्षी व प्रयत्नवादी होता. त्याला फौजेबद्दल फारच अभिमान वाटे. इंग्रजांच्या तोडीची ती व्हावी म्हणून त्यानें फारच प्रयत्न केला. "रणजितसिंगाची एकंदर कामगिरी या देशाच्या राजनैतिक इतिहासांत बरीच महत्त्वाची ठरते. शीखांचे दहा गुरु अथवा बंदाबहादूर यांना जें साधलें नाहीं तें रणजितसिंगानें करुन दाखविलें. शीख राज्याचा संस्थापक, महत्त्वाकांक्षी, युद्धप्रिय, उत्कृष्ट सेनानी, अशा या धाडसी वीराचा "पंजाबकेसरी महाराजा रणजितसिंग" या नांवानें सर्वत्र उल्लेख केलेला आढळतो.

- २ नोव्हेंबर १७८०

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP