कार्तिक वद्य ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) जवाहरलाल नेहरु यांचा जन्म !
शके १८११ च्या कार्तिक व. ६ रोजीं भारताचे जगप्रसिद्ध पुढारी, आंतरराष्ट्रीय राजकारणाचें अभ्यासक व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म झाला. भारतांतील सुप्रसिद्ध राज्यघटनाशास्त्रज्ञ, कायदेपंडित व राजकारणी मुत्सद्दी पंडित मोतिलाल नेहरु यांचे हे एकुलते एक पुत्र. राजेमहाराजे यांना हेवा वाटावा अशा ऐश्वर्यातं यांचे बालपण गेलें. मि. एफ.टी. ब्रुक्स यांच्या हातांखालीं घरगुती इंग्रजी शिक्षण झाल्यानंतर ते इंग्लंडमधील हँरो या प्रसिद्ध शाळेंत गेले. इंग्लंडांतच त्यांचें उच्च शिक्षणहि झालें. भारतांत आल्यावर सन १०२० नंतर त्यांनी वकिली सोडून असहकारितेच्या चळवळींत भाग घेतला व राजकारणाला सर्वस्वीं वाहून घेतलें. सन १९२३ सालीं राष्ट्रसभेच्या चिटणिसाचें काम करुं लागल्यापासून त्यांच्या कर्तबगारीचें तेज विशेष चमकूं लागलें. युरोपच्या प्रवासांत रशियांतील वास्तव्यानें त्यांना नवीन दृष्टि आली. ती त्यांनीं ‘सोव्हिएट रशिया’ या पुस्तकांत मांडली आहे. सन १९२९ मध्यें लाहोरच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचें अध्यक्षस्थान यांना लाभलें तेव्हां भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा निर्धार त्यांनीं केला. यानंतर १९३५, १९३६ आणि १९४६ हीं तीन वर्षे हे राष्ट्रसभेचे अध्यक्ष होते. त्यांनीं लिहिलेलें आत्मचरित्र जगांतील उत्कृष्ट पुस्तकांत गणलें गेलें आहे. यांच्याच दीर्घ प्रयत्नानें आणि महात्मा गांधींच्या तपश्चर्येमुळें भारत देश स्वतंत्र झाला आहे. भारताची सर्वांगीण उन्नति कशी होईल याचीच एक चिंता पंडित नेहरुंना सारखी लागून राहिलेली असते. जगांतील थोर पुढार्यांत पंडितजींचे स्थान फारच वरच्या दर्जाचें आहे. सन १९४९ सालीं त्यांनीं जी अमेरिकेला भेट दिली त्या वेळीं त्यांचा झालेला सन्मान म्हणजे भारतीयांचाच गौरव होता. आंतरराष्ट्रीय राजकांरणांतील मुत्सद्देगिरी पंडित नेहरु चांगलीच जाणत असल्यामुळें सर्व जगांत त्यांना मोठाच मान आहे. हिंदुस्थानच्या जनतेचे तर ते अत्यंत लाडके असे ‘जवाहर’ आहेत.
- १४ नोव्हेंबर १८८९
------------------------
कार्तिक व. ६
ह.भ.प. पांगारकर यांचें निधन !
शके १६६३ कार्तिक व. ६ रोजीं मराठी भाषेंतील प्राचीन संतवाड्मयाचे सुप्रसिद्ध अभ्यासक, रसाळ लेखक, वक्ते व ग्रंथकार ह.भ.प. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचें निधन झालें. महाराष्ट्रांतील सुशिक्षितांच्या घरांत जुन्या काव्याचे लोण पोंचवून तरूण पिढीचें लक्ष जुन्या काव्याकडे वळविण्याचें बरेंचसे श्रेय पांगारकर यांना आहे. प्रवचन, व्याख्यान आणि लेखन या साधनांनीं लक्ष्मणरावजींनीं उभ्या महाराष्ट्रांत तीन तपेपर्यंत अध्यात्म, भक्ति आणि धर्मसंस्कृति यांचा पाऊस पाडला. ‘मुमुक्षु’ नांवाचें साप्ताहिक (नंतर मासिक) काढून भारतीय संस्कृतींतील भक्तिगंगा त्यांनीं घरोघरीं पोंचविली. ‘भक्तिमार्गप्रदीपा’ च्या लाखों प्रती महाराष्ट्रांत आजहि खपत आहेत. मोरोपंतचरित्र, तुकारामचरित्र, ज्ञानेश्वरचरित्र, मराठी वाड्मयेतिहासाचे तीन खंड वगैरे ग्रंथांतून त्यांच्या चिकित्सेचा आणि भावनेचा उत्कृष्ट संगम पाहावयास मिळतो. पांगारकर जातीचे कवि होते. पण आपल्या ‘चरित्रचंद्र’ या आत्मवृत्तांतांत ते लिहितात, "संतसंतांच्या पायीं दडी मारुन राहिली." पांगारकरांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे मोरोपंत, रामदास स्वामी, आणि अहल्याबाई यांच्या सार्वजनिक पुण्यतिथींचा उपक्रम महाराष्ट्रांत यांनीच प्रथम सुरु केला. अध्यात्म आणि भक्ति यांमध्यें रंगणारे पांगारकर राष्ट्रीय बाबतात तितकेच जागरुक होते. ते एका ठिकाणीं लिहितात, "आमचें राष्ट्र आपल्या संस्कृतिबळावरच पुन्हा ऊर्जित दशेला येईल. व्यावहारिक सत्तेंत मी आधीं मराठा, मग हिंदु व शेवटीं विश्वात्मा आहे. सर्व हिंदु लोकांची एक संस्कृति आहे व तिचाच जयजयकार झाला पाहिजे." पांगारकरांसारखे रसाळ वक्ते झाले नाहींत. प्राचीन संतकाव्याचें त्यांचे पाठांतर दांडगें होतें. हजारबाराशें ओव्यांचा त्यांच्याविषयींचा गौरवग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.
- १० नोव्हेंबर १९४१
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP