कार्तिक वद्य ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सर्वज्ञानी राजा तोडरमल्ल !
शके १४११ च्या कार्तिक व. ९ रोजीं अकबर बादशहाचा सुप्रसिद्ध दिवाण राजा तोडरमल्ल याचें निधन झालें. तोडरमल्ल हा जातीनें क्षत्रिया होता. अयोध्या प्रांतांतील लहेरपूरगांवचा हा राहणारा. याचें लहानपण अत्यंत त्रासांत गेलें. तान्हेपणींच बाप वारल्यामुळें मोठ्या कष्टानें आईनें संगोपन केलें. तोडरमल्ल थोडा मोठा झाला; आणि आईची परवानगी घेऊन तो दिल्लीस कामधंदा पहाण्यास आला. तेथें अकबराचा फडणीस मुझफरखान म्हणून होता, त्याच्यापाशीं तोडरमल गेला. तेथें त्यानें कारकुनीचें काम पत्करलें. त्याचा चाणाक्षपणा पाहून मुझफरखानानें त्याला आपला मुख्य दिवाण नेमला. पुढें त्यानेंच तोडरमल्लाची आणि बादशहाची भेट घडविली. बादशहानें त्यास आपल्या खाजगी कारभारांत घेतलें. लेखणीबरोबरच तोडरमल्लानें तरवारहि गाजविली. बादशहाच्या फौजेची त्यानें अत्यंत शिस्तबद्ध अशी व्यवस्था केली. त्याच्या या बंदोबस्तामुळें लोक त्याला ‘सर्वसाक्षी’ व सर्वज्ञानी म्हणूं लागले. चितोडगड, सुरत व रणथंभोर येथील विजय याच्याच मसलतीमुळें बादशहास मिळाले. ‘तोडरमल’ हा खरा शूर शिपाई आहे’, असा याचा लौकिक झाला. यानेंच जमाखर्चाची व वसुलीची व्यवस्था अत्यंत चोख अशी ठेविली. अनेक प्रकारच्या बंडखोरांचे पारिपत्य करण्याच्या कामीं बादशहास तोडरमल्लाचा फारच उपयोग झाला. हा अकबरी लिहिणारा अबुल् फजल् याच्याविषयीं लिहितो, "स्वत:विषयीं यत्किंचितहि महत्त्वाकांक्षा मनांत न वागवितां या पुरुषानें अकबराच्या राज्याच्या अंतर्व्यवस्थेकडे आपलें सगळें चित्त लाविलें, आणि त्यामुळें आपलें नांव चिरस्मरणीय करुन ठेविलें." यानें जमिनीची मागणी करुन तिचें वर्गीकरण केलें व जमीनमहसुलाची पद्धत घालून दिली. याचा शेवट मात्र विपरित असा झाला. काश्मीरवरील कामगिरीहून परत येत असतांना कोण्या वेड्या फकिरानें त्याच्या उरांत खंजीर खुपसला आणि त्यांतच त्याचा अंत झाला.
- १० नोव्हेंबर १५८९
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP