कार्तिक शुद्ध ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) शनिवारवाड्यावर इंग्रजी निशाण !
शके १७३९ च्या कार्तिक शु. ९ रोजीं पुण्याच्या शनिवारवाड्यावर इंग्रजांचें निशाण लागलें. आदल्याच दिवशींच्या येरवड्याच्या लढाईंत मराठ्यांचे मालक बाजीरावसाहेब पुण्यातून आपण होऊन निघून गेले होते. बाळाजीपंत नातू इंग्रजांना सामील झाले होते. झेंडा वाड्यावर कोणीं लावावा याची चर्चा चालू होती. जनरल स्मिथ एल्फिन्स्टनला सांगितलें, " आम्ही शहरांत जाऊन झेंडा लावतों, परंतु फौजेस लूट मिळाली पाहिजे. तेव्हां जवळ बाळाजीपंत नातू होते त्यांनी विनंति केली की, शत्रु तर पळून गेले, आतां गरीब रयतेस लुटण्याचे प्रयोजन काय ? सर्व लोक इंग्रजी अमल होण्याचीच वाट पहात आहेत." ज. स्मिथ बोलले, "दादा, तुम्ही निशाण लावतां काय?" नातू म्हणाले, "मजबरोबर पंचवीस स्वार द्या. म्हणजे मी झेंडा चढवून येतों." मराठ्यांच्या राजधानींत शनिवारवाड्यावर निशाण लावणारा आपल्यापैकींच एक माणूस निघावा यांपेक्षा दुर्दैव कोणतें ? त्या वेळी पुण्याची स्थिती अशी होती. "शु. ९ सोमवार रोजीं ऊन पडतांच तोफांचे दोन गोळे शहरावर टाकले आणि बुधवारचे रस्त्यानें हजार स्वार पळत गेला. फिरंगे यांनीं सरकारचे तळावरील डेरे येऊन जाळले, गावांत आईस लेकरुं पुसेनासें झालें. रस्त्यांत वाट मिळेनाशी झाली. कोणी पर्वतीचे डोंगरांत, कोणी कोणीकडे अशीं गेलीं. नवरा एकीकडे, बायको एकीकडे अशी अवस्था झाली. गावांत बातमी, आतां पुणें जाळतो. इतक्यांत गोसावीपुर्यांतील बंगला जळला. त्यानें लोकांची फार हवालदील झाली ..... साहेब व बाळाजीपंत नातू तीनशें कुडतीवाले घेऊन शहरांत शनिवारपाड्यापाशीं येऊन किल्ल्या आणून दरवाजे उघडले. उभयतांनीं आंत जाऊन गादीस कुर्निसात केल्या; आणि आकाशदिव्याचे काठीस निशाण लावले." याप्रमाणें पेशवाईची इतिश्री झाली. ज्या भगव्या झेंड्यानें शिवरायांच्या काळापासून स्फूर्तिदायक असा मराठ्यांचा इतिहास घडविला, त्याच भगव्या झेंड्याला या दिवशीं खालीं यावें लागलें. कार्तिक शु. ९ हा दुर्दैवी दिवस. याच दिवशीं पेशव्यांच्या वाड्यावर युनियन जँक झळकूं लागलें.
- १७ नोव्हेंबर १८१७
-------------------------
कार्तिक शु. ९
(२) विष्णु गणेश पिंगळे यांना फाशी !
शके १८३७ च्या कार्तिक शु. ९ रोजी लाहोरच्या कटांत भाग घेणारे सुप्रसिद्ध क्रांतिकारक विष्णु गणेश पिंगळे यांना फांशीं देण्यात आलें. ! पिंगळे हे मूळचे पुणें जिल्ह्यांतील तळेगांव ढमढेरे येथील राहणारे; गदर पार्टीच्या इतर सभासदांबरोबर ते अमेरिकेहून परत आले व बंगालमध्यें उतरले. लाला हरदयाळ यांच्या गदर पार्टीचा मुख्य उद्देश म्हणजे शीखांना क्रांतीसाठी हिंदुस्थानांत पाठविणें हा असे. बाँबविद्या शिकविण्याची कामगिरी घेऊन ते पंजाबमध्यें आले. रासबिहारी बोस यांच्या नेतृत्वाखालीं अमृतसर येथें प्रयोग सुरु झाले. तिथिनिश्चयहि होऊन चुकला होता; ठिकठिकाणच्या सैन्यांच्या उठावण्या, बाँब व बंदुका यांचा संग्रह, खेडुतांची संघटना, इत्यादि कार्यक्रम ठराले. परंतु ऐन वेळीं सरकारला कटाचा सुगावा लागला व रासबिहारी बोस यांच्या निवासस्थानावर छापा घालून सात लोकांना अटक करण्यांत येऊन खटला भरण्यांत आला. आणि शेवटीं कार्तिक शु. ९ रोजीं कर्तारसिंग, जगत्सिंग, परमानंदजींनाहि याच वेळीं फांशीची शिक्षा सांगण्यांत आली होती ! पण पं. मालवीय आदि पुढार्यांच्या खटपटीमुळें त्यांची फांशीची शिक्षा रद्द होऊन त्यांना काळ्या पाण्यावर पाठविण्याचें ठरलें. देशवीर विष्णु गणेश पिंगळे हे सन १९०९ मध्यें महाराष्ट्रांतील ’अभिनव भारतीय’ क्रांतिकारकांच्या संगतींत वाढलेले होते. नंतर अमेरिकेंत गेल्यावर हरदयाळप्रभृति कार्यकर्त्यांनी काढलेल्या ‘गदर’ (बंड) या संस्थेंत ते शिरले. हा काळ म्हणजे सन १९१४ च्या महायुद्धाचा होता. याच वेळीं हरप्रयत्नांनीं मातृभूमीस स्वतंत्र करावें ही लाट क्रांतिकारकांच्या मनांतून उद्भवली होती. अधुनिक शस्त्रास्त्रें मायदेशीं पाठवून एकच भडका उडवावा, आणि बंडाची उठावणी करावी असा हेतु होता. लाहोरच्या कटांत कर्तारसिंग व पिंगळे हे दोघे सांपडले. त्या दोघांनींहि ब्रिटिशांची सत्ता व त्यांचा न्यायालयीन अधिकार नाकारला व हंसत हंसत दोघेहि फांशी गेले.
- १५ नोव्हेंबर १९१५
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP