कार्तिक वद्य २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


इंग्रज व शिंदे यांचे लासवारीचें युद्ध !

शके १७२५ च्या कार्तिक व. २ रोजीं लासवारी येथें इंग्रज आणि मराठे यांचे निकराचें युद्ध होऊन शिंद्यांच्या फौजेचा संहार झाला. अलीगडचा किल्ला हातीं आल्यावर इंग्लिशांचा सेनापति लाँर्ड लेक दिल्लीवर आला. येथील लढाईंतहि फंदफितुरी करुन इंग्रजांनीं जय मिळविला. त्यानंतर त्यांचा मोर्चा आग्र्‍याकडे वळला. थोड्याच प्रयत्नांनीं शहर हस्तगत झाल्यावर किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु झाला. आणि किल्लेदार शरण आला. किल्ल्यांतील सर्व सामान, दारुगोळा, तोफांचा व हत्यारांचा कारखाना व प्रचंड द्रव्यसंचय लेकच्य हातांत सांपडला. या विजयाची बातमी दौलतराव शिंदे यांना दक्षिणेंत समजली. तेव्हां तेथून मोठी फौज निघाली. लाँर्ड लेकला सुगावा लागतांच त्यानें आपलें जड सामान फत्तेपूरशिक्रीजवळ ठेविलें व तो तयारीस लागला. भरतपुरापासून बारा कोसांवर असणार्‍या लासवारीजवळ शिंद्यांची फौज एका ओढ्याकांठी तयार होती. "गुलाबराय कदम वगैरे दोन हजार स्वार दक्षिणी, व फडणीस आदि करुन पंधरा पलटनांनिशीं तांब्रांचा मुकाबला केला. चार प्रहर तोफखान्याची लढाई मातबर झाली. प्रथम लेकचा मदतनीस व्हँण्डलूर यानें एकदम हल्ला केला. परंतु त्यांतच तो ठार झाला. त्या प्रसंगीं तुंबळ युद्ध झालें. मेजर ग्रिफिथ्स, जनरल वेअर, वगैरे अनेक शूर इंग्रज लढाईंत ठार झाले. परंतु शेवटीं इंग्रजांस विजयश्रीनें माळ घातली, युद्ध मुख्यत: तोफांचेंच झालें. इंग्रजांकडील दोन हजार गोरे व तीन हजार तेलंगे ठार व पळून गेली." इंग्रजांना मिळालेला हा विजय फार मोठा होता. यायोगें शिंद्यांचा संपूर्ण पराभव होऊन इंग्रजांना आतां मोठा शत्रु उरलेला नव्हता. शिस्त, व्यवस्था, धडाडी, पराक्रम हे गुण शिंद्यांच्या फौजेंत अवश्य होते, परंतु स्वदेशभक्ति, प्रामाणिकपणा, करारीपणा, स्वार्थत्यागबुद्धि या गुणांची ओळख थोडी कमी असल्यामुळें लष्करी सामर्थ्य तुल्यबल असलें तरी शिंद्यांना पराभवाच स्वीकारावा लागला.

- १ नोव्हेंबर १८०३

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP