कार्तिक वद्य ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
भाई परमानंद यांचे निधन !
शके १८६९ च्या कार्तिक व. ११ या दिवशीं पंजाबमधील सुप्रसिद्ध हिंदुसभेचे कार्यकर्ते व पुढारी भाई परमानंद हे निधन पावले. पंजाब युनिव्हर्सिटींतून एम.ए. चें शिक्षण घेऊन हे आर्य समाजांत सामील झाले व लाहोरच्या डी.ए.व्ही. काँलेजांत प्राध्यापकांचें काम करण्यास यांनी सुरुवात केली. दरम्यान उत्तर व दक्षिण आफ्रिकेंतील हिंदी लोकांच्या विनंतीस मान देऊन हंसराज यांनी यांना वैदीक धर्म व संस्काराच्या प्रचाराकरितां आफ्रिकेंत जाण्याची आज्ञा दिली. अशा रीतीनें यांच्या सार्वजनिक आयुष्यास सुरुवात झाली. यांच्या ऐतिहासिक शीख घराण्याचें भाई हें गौरवदर्शक उपपद आहे. आफ्रिकेंत यांच्या घरीं एस. अजितसिंग, सूफी अंबाप्रसाद यांच्यासारखे क्रांतिकारक लोक रहात असत. त्यांच्या कटाचा मागमूस पोलिसांना लागला असल्याचें कळतांच ते तेथून निसटले व हे मात्र पोलिसांच्या तांवडीत सांपडले. अशा तर्हेनें पोलिसांच्या काळ्या यादींत यांचे नांव गोंवलें गेलें. तीन वर्षे हे दक्षिण अमेरिकेंत राहिले तेव्हां तेथील माँर्तनिक या फ्रेंच वसाहतींत त्याला हरदयाळ यांच्याशी यांची ओळख झाली व क्रांतिकारक म्हणून हिंदुस्थानांत पाठविण्यांत येणार्या शीख व इतर लोकांत यांचा समावेश झाला. त्यामुळेंच हिंदुस्थानांत गदर पार्टीच्या इतर सभासदांबरोबर यांना पण अटक झाली. राजाविरुद्ध बंड केल्याच्या आरोपावरुन यांना फाशीची शिक्षा झाली होती. परंतु ती कमी करुन जन्मठेपींत तिचें रुपांतर केलें व यांना अंदमानांत पाठवून दिलें. अनेक वर्षे शिक्षा भोगून तेथील जीवन असह्य झाल्यामुळें त्यांनीं आमरण अन्नत्याग सुरु केला, पण सी.एफ्. अँण्ड्र्यूज यांच्या मध्यस्थीनें वीस दिवसांनंतर यांची मुक्तता झाली. पुढें पांच वर्षेपर्यंत यांनी कौमी विद्यापीठांत कुलगुरुचें काम केलें. परंतु राष्ट्रीयत्वाच्या नांवाखालीं चाललेली हिंदूंची गळचेपी यांना पाहवेना. म्हणून यांनी तसा प्रचार सुरु केला. या ‘धाडसी’ प्रचारामुळें लोकांनीं यांना वेडे ठरविलें, तरीसुद्धां पं. मालवीय, लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद यांच्या सहकार्यानें हिंदुसभेचें कार्य जोरांत सुरु झालें. हे अ.भा. हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते.
- ८ डिसेंबर १९४७
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP