(१) गुरु गोविंदसिंगांचें निधन !
शके १६३० च्या कार्तिक शु. ५ रोजी विचारक्रांतीनें राज्यक्रांति घडविणारा थोर पुरुष, शीखांचा दहावा गुरु गोविंदसिंह यांचे प्राणघातक हल्ल्यामुळें जीवन असह्य होऊन निधन झालें. "एके काळीं हे हिंदुधर्माचे ढालीप्रमाणे संरक्षक होते. हिंदु जातीचें आणि हिंदु धर्माचें रक्षण करण्यासाठी यांनी वीरजात निर्माण केली. हे विद्वानांचें आदरातिथ्य चांगल्या प्रकारें करीत. हे स्वत: मेधावी, देशकालज्ञ, आणि रणनिपुण असे होते." यांनी चांगल्या प्रकारचीं हिंदी कवनेंहि केली आहेत. जाप, सुनीतिप्रकाश, ज्ञानप्रबोध, प्रेमसुमार्ग, बुद्धिसागर, विचित्रनाटक आणि ग्रंथसाहेबांतील कांही भाग असें यांचे वाड्मयीन कार्य आहे. हे मोठे मुत्सद्दी आणि चलाख असल्यामुळे यांच्यापासून शीख पंथांत नवीन मन्वंतर सुरु झालें. लष्करी शिस्तीचें महत्त्व यांनी चांगलेच ओळखिलें होतें. केस, लोखंडी कडें, कंगवा, कच्छ (चोळणा) व कट्यार असे पांच पदार्थ धारण करावेत हा नियमहि यांनींच अमलांत आणिला. गोवधबंदी करुन हिंदूंची सहानुभूति मिळविण्याचा प्रयत्नहि यांनी केला. मुसलमानांनीं यांच्या वडिलांचा छळ करुन शिरच्छेद केला होता. हें ध्यानांत घेऊन गुरु गोविंदसिंह आपलें सामर्थ्य वाढविण्यास तत्पर झाले. सर्वांना यांनी वीरवृत्तीचाच उपदेश देऊन तलवार, घोडे, वगैरे युद्धसाहित्यच गुरुला भेट देण्याविषयीं यांनी प्रथा पाडली. राम, भरत, भीष्म, अर्जुन, आणि भीम यांचा आदर्श डोळ्यापुढें ठेवण्याविषयीं हे नेहमी सांगत. पुढें मुसलमानांशी शीखांची युद्धें सुरु झाल्यावर यांची दोन मुलें युद्ध करतांना मारली गेली. दुसरीं दोन चिणून ठार झालीं. या दु:खानें यांची माता गुजरी हिनें तुरुंगाच्या खिडकींतून उडी टाकून प्राण दिला. गुरु गोविंदसिंह आपल्या जीवितांतील शेवटचे दिवस दक्षिणेंत नांदेड येथें घालवीत असतां एके रात्रीं हे झोंपेंत असतांना अताउल्ला व गूलखाँ या दोन पठाणांनीं यांच्या पोटांत कट्यार खुपसली; याना झालेल्या जखमा असह्य असल्यामुळें कार्तिक शु. ५ रोजी याच अवस्थेंत गोविंदसिंहाचें निधन झालें.
- ७ आँक्टोबर १७०८
-------------------------
कार्तिक शु. ५
(२) लाला लजपतरायांचे निधन !
शके १८५० च्या कार्तिक शु. ५ ला पंजाबांतील सुप्रसिद्ध राजकारणी मुत्सद्दी, वर्तमानपत्रकार, लेखक, वक्ते व सार्वजनिक कार्यकर्ते लाला लजपतराय यांचें निधन झालें. पंजाबांतील जगराण या गांवीं यांचा जन्म शके १७८७ मध्यें झाला. सन १८८५ च्या मध्यें कायद्याची परीक्षा दिल्यावर वयाच्या विसाव्या वर्षाच्या आंतच लजपतराय वकिली करुं लागले. स्वामी दयानंदांचे हे निष्ठावंत अनुयायी होते. लाहोरला स्थापन झालेल्या दयानंद अँग्लो-वैदिक काँलेजला यांनीं पांच लाख रुपये मिळवून दिले. राष्ट्रसभेंत भाग घेतल्यानंतर असामान्य वक्ते व राष्ट्रीय मताचे पुरस्कर्ते म्हणून सर्व भरतखंडांत यांची किर्ति झाली. सन १९०५ मध्यें प्रचारासाठीं राष्ट्रसभेनें यांना विलायतेंस धाडलें होतें. तेथून परत आल्यानंतर शेतकर्यांना चिथावणी देतात या आरोपावरुन सरकारनें लाला लजपतराय यांना मंडालें येथें हद्दपार केलें. पुढें लौकरच यांची सुटका झाली. तरी गुप्त पोलिसांच्या त्रासांतून मुक्त होण्यासाठीं यांनी अमेरिकेत वास्तव्य केलें व तेथें ‘यंग इंडिया’ हें पत्र सुरु करुन यांनी प्रचारास प्रारंभ केला. यानंतर आठ वर्षांनीं हे मातृभूमीस परत आले. त्या वेळीं असहकारितेचें युग सुरु झालें होतें. कलकत्ता राष्ट्रसभेचें अध्यक्षस्थान यांनाच मिळालें आणि असहकारितेचा ठराव यांच्या अध्यक्षतेखालीं पास झाला; परंतु यांनी मात्र ठरावास आपलें मत दिलें नाहीं. ही चळवळ यांना मनापासून पसंत नव्हती; तरी सर्व राष्ट्राबरोबर लजपतराय चळवळींत सामील झाले व तुरुंगांतहि गेले. ‘पीपल’ हें इंग्रजी पत्र, पीपल असोसिएशन, टिळक स्कूल आँफ पाँलिटिक्स या आपल्या संस्थांना यांनी सर्वस्व अर्पण केलें. लाला लजपतराय हिंदु धर्माचे कट्टे पुरस्कर्ते होते. मँझिनी, गँरिबाल्डी, श्रीकृष्ण, शिवाजी इत्यादींचीं स्फूर्तिदायक चरित्रें यांनी लिहिलीं असून यांचें आत्मचरित्रहि प्रसिद्ध आहे. सन १९२८ मध्यें सायमन कमिशन लाहोर येथें आलें असतां यांच्या नेतृत्वाखालीं हजारों तरूण काळीं निशाणें दाखवीत असतां यांना पोलिसांकडून मार बसला. छातीस तीन इंच लांबरुंद जखम होऊन त्यामुळेंच कार्तिक शु. ५ या दिवशी या पंजाबच्या सिंहाचें निधन झालें.
- १७ नोव्हेंबर १९२८.