कार्तिक वद्य ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
रमेशचंद्र दत्त यांचें निधन !
शके १८३१ च्या कार्तिक व. ३ या दिवशीं बंगाल्यांतील प्रारंभीचे आय्.सी.एस. अधिकारी, थोर अभ्यासक, राष्ट्रसभेचे अध्यक्ष, बडोद्याचे दिवाण, हिंदु संस्कृतीचे अभिमानी व ग्रंथकार रमेशचंद्र दत्त हे मृत्यु पावले. यांचा जन्म कलकत्ता येथें झाला. यांचे वडील इसनचंद्र हे डेप्युटी कलेक्टर असून ते बुडून मरण पावले. तेव्हां रमेशचंद्र कलकत्ता येथें हायस्कूलमध्यें शिकत होते. यांचे काका सुशीचंद्र यांनी यांचे पालनपोषण केलें. मँट्रिक झाल्यावर यांनीं तीन वर्षे प्रेसिडेन्सी काँलेजांत शिक्षण घेतलें व नंतर हे आय्.सी.एस. हिंदी विद्यार्थी पास झाला होता. यांचेबरोबर यांचे दोन मित्र सुरेद्रनाथ बानर्जी आणि बिहारीलाल गुप्त हे पण होते. हे त्या परीक्षेत तिसरे आले. नंतर दोन वर्षे इंग्लंडमध्ये हिंडून हे हिंदुस्थानांत परत आले. आल्याबरोबर ‘Three Years in England' हें इंग्रजी पुस्तक यांनी प्रसिद्ध केलें. प्रथम कांही दिवस अनुभव मिळण्याकरितां दुष्काळ व वादळांत झालेलें नुकसान यांसंबंधीं काम करीत असतां यांनी एक निर्भिड लेख ‘स्टेटसमन’ मध्यें लिहिला. त्यामध्यें निवृत्त होणार्या ले. गव्हर्नर सर अँशले ईडन यांच्या कारकीर्दीचें हुबेहुब चित्रण होतें. त्याचबरोबर शेतकी जीवन सुधारण्याचे उपायहि सुचविले. त्यामुळें बंगाल टेनन्सी अँक्ट झाला. मेमनसिंग, बरद्वान, वगैरे जिल्ह्यांत मुख्य म्हणून काम करीत असतां लाँर्ड रिपनच्या वेळीं ग्रामपंचायतीची सूचना मांडून ती यांनीं मान्य करुन घेतली व लवकरच ती सर्व प्रांतांत सुरु झाली. ओरिसाचे कमिशनर व पोलिटिकल एजंट, वगैरे महत्त्वाच्या जागांवर काम केल्यावर मुदत संपण्यापूर्वीच हे सेवानिवृत्त झाले. नंतर जवळजवळ सात वर्षे हे लंडनच्या युनिव्हर्सिटी काँलेजांत हिंदुस्थानच्या इतिहासाचे लेक्चरर होते. तेथेंच त्यांनी रामायण व महाभारतांतील निवडक भागाचा इंग्रजींत पद्यमय अनुवाद केला. तसेंच शेतसारा, राजद्रोह, राज्यसुधारणा वगैरे मूलगामी कार्यामुळें यांना लखनौच्या राष्ट्रसभेचें अध्यक्षस्थान देण्यांत आलें होतें.
- ३० नोव्हेंबर १९०९
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP