कार्तिक वद्य ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
फोंड्याच्या युद्धांत पोर्तुगीझाचा पराभव !
शके १६०५ च्या कार्तिक व. ७ ला संभाजे राजे यांच्या फौजेनें फौंडा येथें अद्वितीय पराक्रम करुन पोर्तुगीझांचा पराभव केला. जंजिर्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीझ व मोंगल बादशहा या तिघांशी मुख्यत: संभाजीला युद्धप्रसंग करावे लागले. पश्चिम किनार्यावर पोर्तुगीझ लोक धर्म व व्यापार या बाबतींत मराठ्यांचा उच्छेद करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळें संभाजी अत्यंत चिडून गेला होता. "फौडा या जलदुर्गावर संभाजीनें पुष्कळ द्रव्यसंचय केला आहे." अशा माहितीवरुन पोर्तुगीझ गव्हर्नरानें फोंड्यावर हल्ला करण्याचें ठरविलें. आणि १७-१०-१६८३ रोजीं आठशें युरोपियन, आठ हजार कानडी पायदळ, व पांच मोठ्या तोफा घेऊन तो गोव्याहून निघाला व त्यानें चार दिवस फौंड्यावर तोफांचा मारा सडकून केला. तटास एक लहानसें खिंडार पडलें. त्यांतून पोर्तुगीझ लोक आंत प्रवेश प्रवेश करीत असतां संभाजीच्या लोकांनीं आंतून मोठ्या आवेशानें लढून तो हल्ला साफ मोडून काढला. एवढ्यांत या हल्ल्याची बातमी संभाजीस समजली. तेव्हां तो चौलहुन त्वेषानें चालून आला आणि त्यानें पोर्तुगीझांचा संपूर्ण पाडाव केला. पावसानें दारु भिजून गेल्यामुळें पोर्तुगीझांच्या बंदुका चालेनात. शेवटीं कार्तिक व. ७ ला मोठ्या नामुष्कीनें गव्हर्नर टाहोरनें खाडी ओलांडून स्वत:चा जीव बचावला व गोवें गांठलें. हा नसता उपद्व्याप केल्याबतल तो बाहेर तोंडहि दाखविण्यास तयार होईना. एका धर्मगुरुच्या मठांत कैक दिवस तो लपून बसला होता. या फोंड्याच्या वेढांत शिवाजीचा विश्वासू सरदार येसाजी कंक व त्याचा पुत्र कृष्णाजी यांनी मोठा पराक्रम केला. " या दोघांनीं फोंड्याचे स्वारींत फिरंग्यासी गांठ पडली असतां बहुत शिकस्त केली. आणि गनीम मारुन काढिला. ते वख्तीं दोघांनाहि जखमा लागून चकचूर झाले. कठीण जखमा राजश्री स्वामींनीं दृष्टीनें पाहिल्या आणि घरासी जावयासी आज्ञा दिली. त्यावर कृष्णाजी कंक यांच्या जखमा घरीं फुटून मयत झाला. - "
- १ नोव्हेंबर १६८३
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP