कार्तिक वद्य ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
थोरले माधवराव पेशवे यांचा अंत !
शके १६९४ च्या कार्तिक व. ८ रोजीं श्रीमंत माधवराव पेशवे यांचा थेऊर येथें अंत झाला. आणि त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी रमाबाई सती गेली. अल्पावधींत माधवराव पेशव्याला जिवापाड श्रम करावे लागले. त्यामुळें आधींच्याच नाजुक प्रकृतीवर विलक्षण ताण पडला. अखेरच्या कर्नाटकच्या स्वारींत त्यांची प्रकृति फारच बिघडली. अंगीं रुजत असलेला क्षयरोग हळूहळू वाढीस लागला. भारतांतील प्रसिद्ध वैद्य महीधर गंगा विष्णु यांचें औषध सुरु झालें. हवापालटासाठी व गजाननावरील भक्ति म्हणूण श्रीमंतांचा मुक्काम थेऊरला होता. कार्तिकांत प्रकृति फारच बिघडली. - "थेऊरास वाड्यांत होते ते देवळाच्या आवारांत येऊन राहिले. सर्व मंडळी झाडून थेऊरास आली. श्रीगणपतीस जलाची संतत धार धरली. ज्वरशांति व अनुष्ठानास ब्राह्मण घातले. कार्तिक शुद्ध ६ रोजीं रमाबाईस सहगमनाविषयी बोध केला. तिणें जबाब दिला; ईश्वरसत्ता प्रमाण ..... एकदम पर्जन्य फार पडला, त्यामुळें हवा खराब झाली. सर्वांगावर सूज आली. कार्तिक शु. ११ ला प्रहर दिवसांत फार गडबडले. भुईवर उतरले, दानधर्म बहूत करवला .... रमाबाई फक्त गोमूत्र व दूध यांजवर पांच-सात दिवस राहिल्या. कार्तिक व. ३ ला रमाबाईंनी सती जाते वेळचीं पातळें आणावयास सांडणीस्वार पुण्यास पाठविला. त्यावरुन पुण्यांत मृत्यूची आवई उठून दोन घटका दुकानं बंद झालीं. मागाहून खरी बातमी समजली. तेव्हां गडबड शांत झाली .... अखेरची वेळ आली. " आम्ही महायात्रेस जातो. स्वारीची तयारी करा.’ म्हणोन श्रीमंत बोलूं लागले. स्तृति अखेर क्षणापर्यंत होती. बुधवार, कार्तिक व. ८ ला दोन घटका दिवस होता, त्या वेळीं ‘गजानन’, ‘गजानन’ म्हणत मोठ्या योग्याप्रमाणें नेत्रद्वारें प्राण गेला. प्रजेचें छत्र गेलें. मोठा घात झाला. बाईसाहेबांनीं तरुणपणांत स्त्रीधर्माची शर्थ केली. सर्व जवाहीर आपले हातानें वाटलें. धर्मशिलेवर उभी राहून सती गेली. श्रीमंताचा प्रताप जसा होता तसा बाईंनीं शेवट केला. सूर्यमंडळ भेदून गेली. ...."
- १८ नोव्हेंबर १७७२
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP