कार्तिक शुद्ध ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


"दौलत खराब झाली !"

शके १७३९ च्या कार्तिक शु. ८ रोजीं इंग्रज आणि मराठे यांची प्रसिद्ध अशी येरवड्याची लढाई झाली. थोड्याच दिवसापूर्वी खडकीच्या लढाईंत इंग्रज-मराठ्यांना एकमेकांचा अंदाज समजला होता. पेशवाईचा धनी बाजीराव कमकुवत असल्यामुळे बापु गोखल्यासारख्या सेनानीला सुद्धां यश प्राप्त झालें नाहीं. मराठेशाहीला या वेळीं उतार लागला होता. तिला सांवरुन धरण्याचें सामर्थ्य कोणाच्याहि अंगांत नव्हतें. एल्फिन्स्टनच्या सांगण्यावरुन जनरल स्मिथ येरवडा येथील टेकडीच्या पश्चिमेस तळ देऊन राहिला. त्याला अडविण्याचा प्रयत्न अक्कलकोटकरांच्या फौजेनें व नारोपंत आपटेंने केला,पण उपयोग झाला नाहीं. मराठ्यांची फौज १६ नोव्हेंबर रोजीं येरवड्यापाशीं येऊन धडकली आणि युद्धास सुरुवात झाली. "रविवार कार्तिक शु. ८ रोजी दोन प्रहरापासून लढाईची तोफ चालती झाली. घोरपडीजवळ खंडेरावाची टेकडी आहे, त्याजवर इंग्रजांनें दोन तोफा लागू करुन मोर्चा कायम केला. त्याजवर अरब व गोसावी पायदळ नदीपुढें जाऊन गोळी चालली. ती मध्यान्ह रात्र पावेतों. गोखले, पुरंदरे, रास्ते, आपटे व पटवर्धन वगैरे मंडळी तोफांजवळ उभी होती. घोरपडीकडून एक पलटण आली; म्हणून गोखले वगैरे तिकडे लढत गेले. संगमावर विंचूरकरांनी घोडा घातला नाहीं व तोफ लावली नाहीं. ..... इंग्रजांच्या लोकांनी सरकारांच्याच तोफा त्याजवर लागू केल्या .... प्रथम रात्रीं श्रीमंत लष्करांतून पळून गेले. त्यामुळे सरकारचा अपजय झाला. दौलत खराब झाली." या रीतीन या लढाईनें पेशव्याच्या राज्याचा शेवट झाला. फंदफितुरीचें साम्राज्य सगळीकडे पसरलेलेंच होतें. या येरवड्याच्या लढाईचें वर्णन शाहीर असें करतात -
" फसले शके सत्राशें एकुणचाळीसांत रणभूमीस ।
ईश्वर संवत्सरांत कार्तिक शुक्ल अष्टमीस,
जलदी करुन साहेबांनीं लाविलें निशाण पुणियाला ।
खेंचून वाड्याबाहेर काढिलें कदिम शिपायाला "

- १६ नोव्हेंबर १८१७

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP