फाल्गुन शुद्ध २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
श्रीरामकृष्ण परमहंसांचा जन्म !
शके १७५० च्या फाल्गुन शु. २ रोजीं बंगालमधील विख्यात सत्पुरुष आणि वेदान्तप्रतिपादक श्रीरामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. हुगळी जिल्ह्यांतील ‘कामारपुकुर’ नांवाच्या एका अप्रसिद्ध गांवी धार्मिक व सनातनी वृत्तीचा ब्राह्मण राह्त होता. त्यांच्या पोटीं रामकृष्णांचा जन्म झाला. परमेश्वरभक्तीची गोडी आणि भावावस्थेचा अनुभव यांना लहानपणापासूनच होता. लहानपणीं यांचें नांव गदाई-गदाधर असें होतें. हे पांचसात वर्षांचे असतांना एकदां आकाशांत काळेभोर ढग यांना दिसले. त्यावरुन पांढरा बगळा उडत होता. तें दृश्य पाहून यांची शुद्ध नाहींशी झाली. अलौकिक भावनांचा साक्षात्कार जणुं यांना झाला. असे प्रसंग वारंवार येऊं लागले. देहभान विसरून वारंवार ब्रह्मस्वरुपांत लीन होऊन स्वानंद उपभोगणें हें यांचें सुख होतें. कलकत्त्याजवळील कालीच्या दक्षिणेश्वर मंदिरात पुजारी म्हणून हे वावरत असत. कालीमातेची एकनिष्ठपणानें यानीं उपासना केली. परमेश्वराला एकनिष्ठपणें भजतां यावें म्हणून हे स्वत:ला स्त्री समजून अनन्यभावानें देवाची उपासना करीत, अर्थातच लौकिक व्यवहारांत यांचें जीवन म्हणजे एखाद्या मुलाप्रमाणें निष्पाप, भोळें व खेळकर असेंच राहिलें. रामकृष्णांच्या तत्त्वज्ञानाची छाप सर्वत्र पसरुन त्यांची कीर्ति वाढूं लागली. आर्य संस्कृतीचा डंका सर्व जगभर पसरविणारे स्वामी विवेकानंद यांचेच शिष्य. त्या वेळीं समाज नास्तिक्याकडे झुकत होता. भौतिक शास्त्रांच्या साह्यानें अंतिम सुख शोधण्याच्या उद्योगांत होता. आणि स्वत्व विसरुन गांगरलेल्या स्थितींत , किंकर्तव्यमूढ स्थितींत अंधारांतच ठेंचा खात होता. अर्थात् या वेळीं रामकृष्णांचा संदेश नवजीवन देणारा ठरला. "नुसत्या शास्त्राध्ययनानें का कोठें प्रगति होत असते ? शास्त्रें वाचून फार तर ईश्वराच्या अस्तित्वाचा बोध होईल. पण त्या नंतर स्वत: साधनें केल्यावांचून त्याचें दर्शन होणार नाहीं. हजार पोथ्या आणि पुराणें वाचा. व्याकुळ होऊन त्याचा धांवा केल्याखेरीज त्याचें दर्शन होणार नाहीं." असा प्रश्न टाकून त्यांनीं परमेश्वरभक्तीचा सुलभ मार्ग दर्शविला आहे.
- १७ फेब्रुवारी १८३६
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP