फाल्गुन वद्य १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचाप्रवर्तक पंडित डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन झाले. हायस्कुलध्ये असल्यापासूनच यांच्या बहुश्रुतपणामुळें शिक्षक यांना ‘एन्सायक्लोपीडीया’ असें म्हणत. येथील शिक्षणक्रम अपुरा असतांनाच ते १९०६ मध्यें अमेरिकेस गेले. आणि तेथील कार्नेल विद्यापीठांत समाजशास्त्राचा अभ्यास त्यांनीं सुरु केला. आणि थोड्याच अवधींत बी.ए., एम.ए., पीएच.डी. या पदव्या त्यांनीं मिळविल्या. History of Castes in India आणि Hinduism, its formation and Future  या त्यांच्या ग्रंथांमुळें इंग्लंड-अमेरिकेंत त्यांना चांगलीच कीर्ति मिळाली. सन १९१२ मध्यें हिंदुस्थानांत आल्यावर प्रथम कलकत्ता विद्यापीठांत थोडे दिवस काम करुन देशभर ‘राष्ट्रधर्मप्रचारकसंघा’ च्या निमित्तानें त्यांनीं प्रवास केला. आणि शेवटीं सन १९१६ सालापासून ज्ञानकोशाचें काम अंगावर घेतलें. या कार्यास लागणारी बुद्धिमत्ता, उद्योगप्रियता, चिकाटी हे गुण त्यांच्या अंगी असल्यामुळेंच त्यांना हें प्रचंड काम करणें शक्य झालें. ज्ञानकोशाच्या प्रस्तावना-खंडातून त्यांची शोधक बुद्धि आणि स्वतंत्र प्रज्ञा दिसून येते. हें. काम चालू असतानांच त्यांनीं ‘विद्यासेवक’ नांवाचें मासिक सुरु केलें आणि त्यांतून आपल्या ‘परागंदा’, ‘गोंडवनांतील प्रिंयवदा’, ‘आशावादी’ या कादंबर्‍या प्रसिद्ध केल्या. याशिवाय ‘गांवसासू’, ‘ब्राह्मणकन्या’, ‘विचक्षणा’ या त्यांच्या कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. या कादंबरी-वाड्मयांतून त्यांनीं महाराष्ट्राला एक नवे दर्शन घडवून दिलें. आजपर्यंत मराठी कादंबरीचें क्षेत्र केवळ सदाशिव पेठ हेंच होतें. डॉक्टर साहेबांनीं तें क्षेत्र अत्यंत विस्तीर्ण करुन त्याला जागतिक स्वरुप दिलें. एकच जगाच्या’ कल्पनेचा पुरस्कार केतकरांनींच प्रथम केला. त्यांची दृष्टीच व्यापक होती. संकलनापेक्षां संशोधनाकडे अधिक कल असल्यामुळें ‘प्राचीन महाराष्ट्र’ नामक ग्रंथ लिहिण्य़ास सुरुवात केली. त्यापैकीं पहिला खंड प्रसिद्धहि आहे.

- १० एप्रिल १९३७

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP