फाल्गुन वद्य १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
पालखेडला निजामाचा कोंडमारा !
शके १६५० च्या फाल्गुन व. १२ रोजीं पहिल्या बाजीरावानें पालखेड येथें निजामाचा संपूर्ण मोड केला. या वेळीं निजामुल्मुल्कानें दक्षिणेंत आपले बस्तान नीटपणें बसविलें होतें. दिल्लीच्या बादशहापासून दक्षिणच्या सहाहि सुभ्यांतून खंडणी घेण्याचा हक्क बाळाजीनें मिळविला होता. त्याप्रमाणें मराठे वसूल करीतहि असत, परंतु आतां त्याना धुडकावून लावावें व आपण पूर्ण स्वतंत्र व्हावें असा प्रयत्न निजामानें सुरु केला. कोल्हापूरकर संभाजी निजामास जाऊन मिळाला. चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर हेहि आपल्या बाजूस आहेत असें पाहून वसूल करणार्या लोकांना निजामानें दरडावून विचारलें, "खरा वारसदार कोण ? कोल्हापूरकर कीं सातारकर, तें अगोदर ठरवा. मग खंडणीची बात बोला." या प्रकारें निजामाचा उद्धटपणा पाहून शाहूस संताप आला. त्यानें निजामाचें पारिपत्य करण्यासाठी बाजीरावास आज्ञा केली. बाजीरावानें स्वारीची तयारी करुन निजामाचे साह्यकर्ते संभाजी व चंद्रसेन एकत्र होण्यापूर्वीच जालना प्रांत हस्तगत केला व तेथील खंडणी वसूल केली. बाजीरावाचा पाठलाग निजामनें मोठ्या कष्टानें केला, पण त्यात त्याला यश मिळालें नाहीं. मोंगल व मराठे यांच्यांत वारंवार चकमकी होऊं लागल्या. शेवटीं पैठणशेजारीं पालखेड येथें निजामाचा कोंडमारा केला, फाल्गुन व. १२ रोजीं त्यानें पालखेडनजीक आकस्मिकपणें निजामास गांठून त्याला कोंडून धरलें. निजामाचा तोफखाना दूर राहिल्यामुळें त्याचें कांहीं चालेनासें झालें. बाहेरचें दळणवळण तुटल्यामुळें कठीण अवस्था निर्माण झाली. दाणावैरण व अन्नपाणी बंद होऊन सैन्याचे हाल होऊं लागले. निजाम अगदीं त्रस्त होऊन गेला. त्याचे साह्यकर्ते त्याला मदत करीनात. तेव्हां बाजीरावांशीं समेट करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. ऐवज खानाच्या मध्यस्थीनें कराराचीं बोलणीं सुरु झाली. संभाजीस आपल्या स्वाधीन करण्याविषयीं बाजीरावानें आग्रह धरला. चौथाई व सरदेशमुखीचे हक्क निजामानें मान्य केले. कांहीं किल्ल्यांचीहि प्राप्ति मराठ्यांना झाली. याप्रमाणें मराठ्यांना अनुकूल असा तह झाला.
- २५ फेब्रुवारी १७२८
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP