फाल्गुन शुद्ध ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) दादोजी कोंडदेव यांचें निधन !

शके १५६८ च्या फाल्गुन शु. ११ रोजीं छत्रपति शिवाजीमहाराज राजे यांचे लहानपणींचे शिक्षक दादोजी कोंडदेव यांचें निधन झालें. शिवाजीला शिक्षण देण्यांत दादोजी कोंडदेवानें जिजाबाईला फारच साह्य केलें होतें. "मुसलमानी अमलांतील परिस्थिति चांगली ओळखणारा धोरणी व चतुर असा हा पुरुष होता. " हा मलठणचा कुलकर्णी असून भोसल्यांच्या कुटुंबाचा व याचा ऋणानुबंध बराच होता. शहाजी कर्नाटकाचे कामगिरीवर गेले असतां शिवाजी व जिजाई यांचा सांभाळ करण्याचें काम शहाजीनें यालाच सांगितलें होतें. दादोजीनें कसब्यांत रंगमहाल नांवाचा वाडा बांधून जवळच हत्ती, घोडे, वगैरेंची पागा तयार केली. कोंडाण्यास लागून असलेलें शिवापूर गांव त्यानें शिवाजीच्या नांवानें वसविलें. तेथें उंची फळांचे बाग तयार केले. दादोजी कोंडदेव राजकारण जाणणारा, चतुर, मुत्सद्दी व करडा प्रधान होता. त्याची शिस्त मोठी कडक होती. राज्यव्यवस्था व न्यायपद्धति यांची प्रसिद्धि दादाजींमुळेंच झाली. हा मोठा करारी व पापभीरू होता. हातून कांहीं आगळीक घडल्यामुळें स्वत:स शिक्षा करण्यांकरतां यानें आपल्या हाताची एक बाही आमरण आंखूड ठेवली अशी आख्यायिका आहे. मावळे लोकांचा विश्वास संपादन करुन यानें त्यांची एक विनकवायती पायदळ पलटण तयार केली, प्रांतांत होणारा लांडग्यांचा उपद्रव नाहींसा करुन मावळ प्रांत वस्तीस लायक केला, जागजागी चौक्या, पहारे बसवून चोरांची भीति नष्ट केली. शेतीची मोजणी, तिचा वसूल यां संबंधींहि कांहीं ठराव यानेंच केले. असा हा वृद्ध दादोजी फाल्गुन शु. ११ रोजीं मरण पावला. लागलीच त्याची बायको निश्चेष्ट पडली, ती परत उठली नाहीं असें सांगतात. दादोजीच्या मृत्यूमुळें शिवाजी व जिजाबाई यांना फारच दु:ख झालें. मरणापूर्वी दादोजीनें शिवाजीस पुढीलप्रमाणें उपदेश केला होता, "गोब्राह्मणांचें प्रतिपालन करण्याचा जो उद्योग तुम्हीं आरंभिला आहे तो तसाच चालवून धर्मसंस्थापना करा, यांत देव तुम्हांला यश देईल. -"

- ७ मार्च १६४७
--------------------

(२) इंग्रज-मराठे यांच्यांतील पुरंदरचा तह !

शके १६१७ च्या फाल्गुन शु. ११ रोजीं इंगज आणि मराठे यांच्यामधील प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला. सुवर्णमय असणार्‍या भारतांत गोवें आणि उत्तर कोंकण येथें पोर्तुगीझांनीं आपलें बस्तान स्थिर केलें आणि मद्रास व बंगाल इकडे इंग्रजांचा उत्कर्ष होत राहिला. मराठी राज्य कांही काळपर्यंत तरी का होईना खंबीर असल्यामुळें मुंबईकडे इंग्रजांचा शिरकाव होणें दुरापास्त झालें पुढें पेशव्यांच्या दरबारांत गृहकलह आहे कीं काय याचा तपास मॉस्टीन नांवाचा इंग्रज वकील करुं लागला. त्याच्या सुदैवानें राघोबादादा त्याला मित्र भेटले. नारायणरावांच्या खुनानंतर राघोबाविरुद्ध बारभाईंचे कारस्थान उभारलें गेलें व रघुनाथराव उत्तरेकडे पळूं लागले. हरिपंततात्या त्यांचा पाठलाग करीत होते. ही संधि इंग्रजांनीं साधिली. इंग्रजांनीं पूर्वीचा सर्व तह विसरून साष्टी घेतली. राघोबा सुरतेस इंग्रजांच्या आश्रयास आले; आणि घरभेदेपणा पत्करुन त्यांनीं इंग्रजांशीं तह केला. आणि कर्नल कीटिंग यांच्याबरोबर अडीच हजार इंग्रजी फौज राघोबास मदत करण्यास सिद्ध झाली. शिंदे, होळकर व हरिपंत रघुनाथरावांचा पाठलाग करीतच होते, परंतु राघोबास इंग्रजांचा आश्रय मिळाल्याचें पाहून शिंदे-होळकर स्वस्थ राहिले एकट्या हरिपंतानें इंग्रजी फौजेशी सामना दिला. दोनहि पक्षांकडील बरेंच नुकसान झालें. मध्यंतरी नवीन प्रकरण निर्माण झालें. कलकत्त्याच्या हेस्टिंग्जनें मुंबईकर इंग्रजांना कळविलें, "राघोबाचा पक्ष घेऊन तुम्ही आपल्या अधिकाराबाहेर वर्तन केलें. युद्ध ताबडतोब बंद करा." आणि सखाराम बापूसहि लिहिलें कीं, "मुंबईकरांनीं चालविलेलें युद्ध आम्हांस मान्य नाहीं. तुम्हांकडे बोलणें करण्यास वकील पाठवतों. तहाची योजना करा." कर्नल अँप्टन हा इंग्रज वकील कलकत्त्याहून तहाचें बोलणें करण्यास आला. बर्‍याच वाटाघाटी झाल्या, पण साष्टी वगैरे मुलूख मराठ्यांचीहि स्थिति ठीक नव्हती. तेव्हां दोघांच्यांत फाल्गुन शु. ११ रोजीं तह ठरला. इंग्रजांच्या फौजा परत जाव्या, राघोबानें कोपरगांवीं रहावें; पेशव्यांच्या विरुद्ध इंग्रजांनीं इतर कोणालाहि मदत करुं नये.

-२९ फेब्रुवारी १७७६

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP