फाल्गुन वद्य २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“आतां मज जाणें प्राणेश्वरासवें !”
शके १५७१ च्या फाल्गुन व. २ रोजीं महाराष्ट्रांतील विख्यात सत्पुरुष तुकारामबोवा यांचें निर्याण झालें. संसारांत संकटपरंपरा निर्माण झाल्यावर मूळचेच परमार्थप्रवण असलेले तुकाराम परमेश्वराकडे संपूर्ण वळले. कीर्तनकारांच्या पाठीमागें ध्रुपद धरुन तुकोबांनीं “कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें.” भंडार्याच्या डोंगरावर जाऊन ज्ञानदेव – एकनाथांच्या वाड्मयाचें वाचन सुरु केल्यावर त्यांचें चित्त निर्मळ झालें. थोड्याच दिवसांत गुरुकृपा होऊन बोवांना कवित्वाची स्फूर्ति झाली. आणि त्यांच्या तोंडून पाझरणार्या काव्यगंगेंत महाराष्ट्रीय जनता सुखावली. तीन-चार शतकांपूर्वी ज्ञानदेवांनी संस्कृतांतील तत्वज्ञान मराठींत आणून मोठी कामगिरी केली. पण तें तत्वज्ञान अंतराळी होतें. त्याला आपल्या अभंगवाणीनें भूमितलावर तुकोबांनीं आणलें. स्वत: परमेश्वराची प्राप्ति करुन घेतल्यावर तुकोबा ‘उपकारापुरते उरले’ होते. आपण स्वत: जेवून तृप्त झाल्यावर इतरांना संतर्पण करण्यासाठीं ह्यांचे जीवित होते. तत्कालीन समाजांतील अनिष्ट चाली, ढोंगें, बुवाबाजी, नवससायास, यांवर तीव्र प्रहार करुन समाजसुधारकाचें काम त्यांनी चोखपणे बजाविलें. केवळ स्वत:चाच मोक्ष साधणारे तुकोबा नव्हते. सर्वांना त्यांनीं वैराग्याचा बोधहि दिला नाहीं. तर प्रपंच हाच हरिरुप मानून निरहंकार वृत्तीनें रहावें हा भागवत धर्माचा श्रेष्ठ संदेश त्यांनी थेट सामान्य जनतेपर्यंत पोंचविला. शेवटीं शके १५७१ च्या सुमारास आपलें कार्य संपल्याची जाणीव त्यांना झाल्यावर त्यांनीं आवराआवरीस सुरुवात केली. फाल्गुन व. २ च्या कीर्तनांत तुकोबा बोलूं लागले –
“सकळांहि माझे बोळवण करा । परतोनी धरां जावें तुम्ही ।
आतां मज जाणें प्राणेश्वरा सवें । माझिया भावें अनुसरलों ॥
वाढवितां लोभ होईल उशीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥“
सर्व लोक भजनप्रेमांत तल्लीन झाले होते. ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत तुकोबा भावावेशात येऊन पांडुरंगाशीं एकरुप झाले !
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP