फाल्गुन शुद्ध १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


सर ग्रियर्सन यांचें निधन !

शके १८६२ च्या फाल्गुन शु. १० रोजीं भारतांतील भाषाशास्त्राच्या अभ्यासाचे जनक, पुरातत्त्ववेत्ते सर जॉर्ज आब्राहम ग्रियर्सन यांचें निधन झालें. वयाच्या तेविसाव्या वर्षी सिव्हिल सर्व्हंट म्हणून हे नोकरींत रुजू झाले. तेव्हांपासून ग्रियर्सन आपला वेळ भारतातील भाषा आणि लिप्या यांच्या संशोधनांत घालवूं लागले. दांडगा व्यासंग व भरपूर मेहनत हें यांच्या कामगिरीचें वैशिष्ट्य होतें. सन १८७७ मध्यें यांनी कालिदासावरील आपला पहिला निबंध प्रसिद्ध केला. यांच्या पंचायशीच्या वाढदिवशीं ‘व्हॉल्यूम ऑफ इंडियन अँड इराणियन स्टडीज्‍’ हा ग्रंथ त्यांना अर्पण करण्यांत आला. त्यांत त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. या ग्रंथांतील वीस पृष्ठे यांच्या लिखाणांच्या सूचीनें व्यापिलीं आहेत. भारतांतील दोनशेंपेक्षां अधिक लिप्यांशीं यांचा चांगला परिचय होता. अनेक भाषाहि यांनीं अवगत केल्या होत्या. कित्येक ज्ञात आणि अज्ञात भाषांचीं व्याकरणें यांनीं लिहिलीं आहेत. यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’ या ग्रंथाच्या वीस खंडांची निर्मिती ही होय. "यामुळें हिंदुस्थानांतील भाषांच्या अभ्यासकांना पूर्वपरंपरा तर प्रगट करुन दाखविलीच, शिवाय त्या त्या भाषेंतील अनेक उतारे देऊन नवीन अभ्यासकांना सांगाडा निर्माण करुन देऊन त्यांच्या घटनेचा अभ्यास करुन त्यांची वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला. यांच्या या कार्यामुळें हिन्दी विश्वविद्यालयांचें भाषाशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाकडे लक्ष ओंढलें गेलें." ग्रियर्सन यांच्या या प्रचंड प्रयत्नांमुळें भाषाशास्त्रांत नवीन नवीन शोध लागण्यास बरेंच साह्य झालें. जगांतील सर्व भागांतूण पदव्या आणि मानसन्मान यांचा वर्षाव यांच्यावर यांच्या उत्तरायुष्यांत झाला. बंगाल व मुंबई येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या शाखेचे हे ऑनररी फेलो होते. नागरी प्रचारिणी सभा (काशी), बिहार अँण्ड ओरिसा रीसर्च सोसायटी, दि मॉडर्न लँग्वेज असोसिएशन, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया व वंगीय साहित्य परिषद, आदि संस्थांचे हे सभासदहि होते.

- ८ मार्च १९४१

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP