फाल्गुन वद्य ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"त्यांस ईश्वरें यश दिलें !"
शके १६९२ च्या फाल्गुन व. ७ रोजीं हैदर आणि मराठे यांच्यांत प्रसिद्ध मोतितलावाची लढाई होऊन हैदराचा प्रचंड पराभव झाला. माधवराव पेशव्यांचें सर्व लक्ष दक्षिणेकडील कर्नाटक प्रांतीं असे. कर्नाटकां त्यांने एकंदर पांच स्वार्या केल्या; पैकीं पहिल्या चार स्वारींतून ते स्वत: हजर होते. पानिपतचें संकट कोसळल्यावर मराठ्यांच्या सर्वच शत्रूंनीं उचल खाल्ली. त्यांत हैदरअल्ली प्रमुख होता. त्यानें एकामागून एक असे मराठ्यांचे प्रांत घेण्यास प्रारंभ केला. तेव्हां त्याचा बंदोबस्त करणें माधवरावांना क्रमप्राप्तच होतें.
शके १६९२ च्या सुमारास त्रिंबकराव मामानें बिदनूर प्रांतावर स्वारी करण्याचा विचार केला. मोठ्या सैन्यानिशीं हैदरहि तयार होताच. त्रिंबकरावांनीं सखाराम हरि गुप्तेकरवीं सर्व बारीकसारीक माहिती मिळवली; आणि मराठ्यांनीं बिदनूर व श्रीरंगपट्टणच्या दरम्यान हैदरास कोंडलें. परंतु कसें तरी करुन हैदर मेल कोट्याहून श्रीरंगपट्टणास निघाला, त्याच वेळीं त्याला मराठ्यांनीं गांठलें आणि तुंबळ युद्ध केलें. हैदर उजवीकडच्या डोंगराकडे पळून गेला. टिपू फकिराचा वेष घेऊन निसटला. या लढाईस ‘मोतितलावाची लढाई’ असें नांव आहे. या लढाईचें वर्णन असें सांपडतें. "मराठ्यांनीं थेट हैदराच्या तोफावर चालून जाऊन त्या बंद पाडिल्या, तेव्हां तोफा सोडून आराव्यांत शिरतांच त्याचा मोड झाला. हत्ती, तोफा वगैरे सलतनत लुटली गेली. पंचवीस हजार माणूस, गाडदी बारा हजार, व पन्नास तोफा येणेंप्रमाणें एक घटकेंत सत्यानाश झाला. मात्र या लढाईंत नीळकंठराव त्रिंबक पटवर्धन व त्याचे दुसरे आठ इसम गोळी लागून ठार पडले. अनुचित गोष्ट झाली. नीळकंठराव मोठें रत्न होतें ! त्रिंबकराव मामा फारच श्रमी झाले. हैदर नायकांचें झुंज असें कधीं झालें नाहीं. पंचवीस हजार गाडद्यांची एक शिलग होई तेव्हां गगन गर्जत असे. नीळकंठराव, परशुरामभाऊ, वामनराव बाबा या तिघांनीं व लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी मोठी शर्थ केली. नीळकंठरावामुळें हर्षभंग झाला. श्रीमंत थोर पुण्यवंत, त्यांस ईश्वरें यश दिलें. "
- ७ मार्च १७७१
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP