फाल्गुन शुद्ध ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
हिंदु धर्माची विलक्षण ओढ !
शके १८४९ च्या फाल्गुन शु. ६ रोजीं गोमांतकांतील चिंबूल गांवी एक हजार गावडे-ख्रिस्त्यांना हिंदु करुन घेण्याचा फारच समारंभ झाला. शुद्धीकरण चळवळीच्या इतिहासांत हा प्रसंग सुवर्णाक्षरांनीं लिहिण्याजोगा आहे. उत्ततेंत आर्य समाजासारख्या संस्थांनीं व पं. मालवीयांसारख्या नेत्यांनीं परधर्मांत गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु करुन घेण्याचा सपाटा चालविला होता. गोव्याकडे व वसईकडे अंतरंगानें व संस्कृतीनें पूर्ण हिंदु असलेल्या, परंतु अपरिहार्यतेनें ख्रिश्चन राहिलेल्या हजारों लोकांना पुन्हा हिंदु धर्मांत घेण्यास कशी सुरुवात करावी हा प्रश्न त्याबाबतची चळवळ करणार्या इकडील मंडळींना अस्वस्थ करीत होता. ख्रिश्चन राजसत्तेच्या भीतीनें या भागांतील लोक एकेकटे किंवा कुटुंबश: शुद्धीकरण करुन घेण्यास भीत होते. मोठ्या प्रमाणात सामुदायिक शुद्धीकरणाचा मार्ग अनुसरण्याखेरीज गत्यंतर नव्हतें. हा पहिला मोठा शुद्धिसमारंभ फाल्गुन शु. ६ ला चिंबूल येथें श्रीविनायकमहाराज मसूरकर यांचे शिष्य श्री. आनंदमूर्ति यांनीं केला. गोमांतकाच्या इतिहासांत प्रथमच पडणार्या या भव्य समारंभास सर्व गोमांतकांतून हजारों हिंदु-व्यापारी, अधिकारी, जमीनदार व शास्त्री-पंडित आले होते .......... त्याच दिवशीं दुपारीं कुर्क येथें चारशें ख्रिस्त्यांना हिंदु धर्मात घेण्यांत आलें; व तेव्हांपासून गोवा-सरकारचा व तेथील कट्टर ख्रिस्त्यांचा विरोध होत असतांनाहि त्या भागातील बाटले ख्रिस्ती आईला पाहून मुलानें झेंप घ्यावी त्याप्रमाणें पुन्हां हिंदु धर्मास कवटाळण्यास आनंदानें सिद्ध झाले. हिंदुस्थानवर परधर्मीयांचे जे हल्ले झाले, त्यांत हिंदूंना अति त्रास सहन करावा लागला, मुसलमानी राजवटींत तर हिंदु धर्मच नष्ट होतो कीं काय असा प्रसंग येऊन ठेपला. मुसलमान सत्ताधारी हिंदुंना सक्तीनें बाटवीत असतच. परंतु इंग्रज मिशनरीहि गोड गोड बोलून आपले अनुयायी वाढवीत होते. गोमांतकातील हिंदूंचा धार्मिक छळ विख्यातच आहे.
- २६ फेब्रुवारी १९२८
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP