फाल्गुन शुद्ध १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
दांडी-यात्रेचा प्रारंभ !
शके १८५१ च्या फाल्गुन शु. १२ रोजीं महात्मा गांधींच्या प्रसिद्ध दांडीयात्रेला प्रारंभ झाला. भारताच्या विस्तृत किनार्यावर अपरंपार मीठ तयार होत असूनहि या रोज लागणार्या वस्तूवर सरकारला कर द्यावा लागत असे. त्याविरुद्ध गाधींजींनीं लढा पुकारला. सरकार दाद देत नाहीसें पाहून सत्याग्रह करण्याचें त्यांनीं ठरविलें. गुजराथमधील दांडी हें क्षेत्र निवडण्यांत आलें. फाल्गुन शु. १२ रोजीं सकाळीं साडेसहा वाजतां या अभूतपूर्व यात्रेस प्रारंभ झाला. त्यांच्या कपाळावर कुंकुमतिलक शोभत होता. हातांत आधारासाठी एक काठी होती. अंगावर दोनच खादीचीं वस्त्रें आणि कमरेला घड्याळ ! " वल्कलें परिधान करुन पित्याच्या प्रतिज्ञापलनासाठीं कर्तव्यबुद्धीनें वनवासास निघालेल्या श्रीरामचंद्रांचें तेज गांधीजींच्या मुखावर खेळत होतें." सुवासिनींनीं पंचारती घेऊन ओवाळल्यानंतर यात्रेंतील पहिलें पाऊल पडलें. या तुकडींत एकूण बहात्तर सत्याग्रही वीर होते. वाटेनें प्रत्येक खेडेगांवांत या महात्म्याचें अपूर्व स्वागत झालें. सुरत, नडियाद, आदि शहरांत हजारों रुपयांच्या राशी गांधीजींच्या पायावर अर्पण करण्यांत आल्या. "मला पैसा नको. खादी, दारुबंदी व ऐक्य या कार्यावर शक्ति खर्च करा" असा उपदेश ते देत असत. "मलयगिरीवरील शीतल, सुगंधी व संजीवक अशा वार्याप्रमाणें गांधीजी आपल्या सेनेसह या गांवाहून त्या गांवास चालले. खेडेगांवांतील गरीब व अडाणी पण साध्याभोळ्या व प्रेमळ शेतकर्यांनीं त्यांच्या रस्त्यावर पाणी शिंपून व लतापल्लवांचीं तोरणें उभारुन व कोठें कोठें वाजंत्री वाजवून त्यांचें उत्साहानें स्वागत केलें." सत्यासाठीं, न्यायासाठीं गांधींचा हा लढा होता. "राज्यकर्त्यांचा नाश करणें हा आमचा हेतु नव्हे, पण राज्यपद्धतीचा मात्र उच्छेद झाला पाहिजे." "आतां मला स्पष्ट असें वाटतें कीं, इंग्रजी राज्याचा नाश करण्यासाठीं माझा जन्म झाला आहे. .... मला घाण्यांत पिळून काढलें तरी मी या राज्याचा नाश करावा असेंच सांगत राहीन." असा त्यांचा संदेश होता.
-१२ मार्च १९३०
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP