फाल्गुन वद्य ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
छत्रपति राजाराममहाराजांचें निधन !
शके १६२१ च्या फाल्गुन व. ९ रोजीं शिवाजीमहाराजांचे धाकटे चिरंजीव श्रीराजाराममहाराज यांचें निधन झालें. राजारामाचा जन्म शके १६६२ मध्यें सोयराबाईंच्या पोटीं झाला. शिवाजीनंतर अठराव्या दिवशींच याला गादीवर बसविलें होतें; परंतु पुढें दोन महिन्यांनीं संभाजीनें याला कैदेंत टाकून सर्व कारभार स्वत:कडे घेतला. पुढें संभाजीच्या वधानंतर येसूबाईच्या सल्ल्यानें शाहू वयांत येईपर्यंत राजारामानेंच कारभार पाहावा असें ठरुन दि. ०९/०२/१६८९ रोजीं राजारामाचें दुसरें मंचकारोहण झालें. या वेळी परिस्थिति मोठी बिकट होती. खजिना रिकामा असून सैन्यांत शिस्त नव्हती. तेव्हां रायगडावर स्थिर राहणें इष्ट नसल्यामुळें राजारामास सर्वत्र हिंडावें लागलें. रायगडास झुल्फिकारखानाचा वेढा पडल्याबरोबर राजाराम तेथून बाहेर पडला व प्रल्हाद निराजी, धनाजी जाधव, संताजी घोरपडे आदि मंडळींसह वेषांतर करुन तो जिंजीकडे जाण्यास निघाला. पुढें मोंगलांनी जिंजीसही वेढा दिला. सात वर्षेपर्यंत पूर्वी खटपट करुनहि मोंगलांस यश आलें नाहीं. शत्रूच्या हातावर तुरी देऊन राजाराम वेलारहून विशाळगडास गेला. नंतर सैन्य जमवून वर्हाड-खानदेशमध्यें चौथाई व सरदेशमुकी जमविण्यास यानें सुरुवात केली. परंतु झुल्फिकारखानानें पाठलाग केल्यावर मोठ्या कष्टानें हा सिंहगडी येऊन पोंचला. "शिवाजी-संभाजीचा आवेश त्याच्या अंगीं कधींच प्रगट झाला नाहीं. प्रवासांत थकवा आल्यानें त्यास उचलून घेऊन जाण्याचे प्रसंग वारंवार आले ...... सातार्यापासून नगरपर्यंतच्या प्रवासांत राजारामास थकवा वाटे .... त्यास छातीचा विकार असावा. बरोबरचे सरदार सातार्याचे बचावास धावले, तेव्हां राजाराम आश्रयार्थ स्वारीहून सिंहगडीं आला. आणि तेथें अल्प काळ ज्वर येऊन आणि छातीच्या विकारानें रक्ताच्या गुळण्या होऊन त्याच आजारांत तो फाल्गुन व. ९ रोजीं मरण पावला. स्त्री अंबिकाबाई सती गेली."
- २ मार्च १७००
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP