फाल्गुन शुद्ध १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
इंद्रजिताचा मायावी पराक्रम !
फाल्गुन शु. १४ रोजीं रावणाकडील खराचा पुत्र मकराक्ष याचा रामानें वध केल्यावर इंद्रजित युद्धास सरसावला. कुंभकर्णाचा वध झाल्यावर त्याचे पुत्र कुंभ व निकुंभ वानर सैन्यावर चालून आले. त्या सर्वांनी रणांगणांवर आपली आहुती दिली. नंतर खराचा पुत्र मकराक्ष यास रावणानें रामावर पाठविलें. शेवटीं त्याचाहि नाश झाल्यावर रावण त्वेषानें इंद्रजितास बोलला, “इंद्रजिता, तूं इंद्रासहि जिंकलें आहेस. रामलक्ष्मणांचा तुझ्यापुढें टिकाव लागणार नाहीं. तूं स्वत: जाऊन त्या दोघांचा नायनाट कर.” याप्रमाणें प्रोत्साहित झालेला इंद्रजित रणांगणावर आला व वानर सैन्यावर एकसारखी बाणवृष्टि करण्यास त्यानें प्रारंभ केला. अदृश्य असणार्या रथांतून बाण येत असल्यामुळें बिचार्या वानरांची अत्यंत त्रेधा उडाली. लाखों वानर मरुन पडले. कित्येक जण भ्रमिष्ट होऊन सैरावैरा पळूं लागले. रामलक्ष्मणांवरहि बाण येऊं लागल्यावर त्यांनीं आपल्या शस्त्रविद्येनें त्यांचा प्रतिकार केला. परंतु बाणांची वृष्टि करणारा इंद्रजित दिसेना तेव्हां लक्ष्मण क्रोधानें बोलला, “राक्षसमात्रांचा नि:पात करण्यासाठी ब्रम्हास्त्र सोडतों म्हणजे इंद्रजित असेल तेथें मरण पावेल. “ यावर रामानें इशारा दिला, “अपराधी व निरपराधी यांची सरसहा कत्तल करुं नकोस.” त्यामुळें लक्ष्मण स्वस्थ राहिला. दुसर्या दिवशीं मायावीं असें सीतेचें शरीर निर्माण करुन मारुतीच्या देखत तिचा वध केला. रामाला ही बातमी समजल्यावर त्यास अतिशय दु:ख झालें. शेवटीं बिभीषणानें रामलक्ष्मणाचें सांत्वन केलें : “महाराज, तुम्ही बिलकुल शोक करुं नका. रावण सीतेचा कधींहि घात करणार नाहीं. इंद्रजितानें मारली ती मायावी सीता असली पाहिजे. उठा. शोक करण्याची ही वेळ नाहीं. इंद्रजित निकुंभिलेस यज्ञ करण्यास जात आहे. यज्ञ समाप्त करुत तो रथावर चढला कीं देवांनांहि त्याला जिंकणें अशक्य होईल. त्याच्या आंत इंद्रजिताचा समाचार घेतला पाहिजे.”
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP