नृसिंहअवतारचरित्र
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७९५५॥
हरिच्या भक्तांसी गांजितो चांडाळ । तयासी गोपाळ अंगिकारी ॥१॥
पिता पुसे पुत्रा लिहिलीं अक्षरें । वाचोनी सत्वर दावी आतां ॥२॥
पुत्र वाची अक्षरें हरीनामपाठ । हरिनाम वैकुंठमार्ग सोपा ॥३॥
हरीनामपाठ ऐकोनी श्रवणीं । क्रोध त्याचे मनीं प्रकटला ॥४॥
कैंचें रामनाम आणिलीं अक्षरें । वधावया शिर धांविन्नला ॥५॥
पूर्वीचा वैरी आणीयेला वाचे । काय ब्रिद त्याचें वानितोसि ॥६॥
वधिला प्रल्हाद बांधिला चरणीं । तेव्हां तो वनमाळी कुर्मरुप ॥७॥
कुर्मरुप धरुनी तारीला प्रल्हाद । तेव्हां गर्वामध्यें फुंदतसे ॥८॥
मरो ऐसा पुत्र न देखों नयनीं । गजाचे चरणी बांधी त्यासी ॥९॥
आणियेला गज बांधिला चरणीं । गोविंद आणोनी सेज करी ॥१०॥
देखोनियां पुत्रा कोप आला भारी । अग्नीच्या भीतरीं टाकियेला ॥११॥
टाकितां प्रल्हाद आग शांत झाली । सांभाळी माउली कृष्णनाथ ॥१२॥
पर्वता वरोनी टाकिला प्रल्हाद । सांभाली गोविंद वरच्यावरी ॥१३॥
रामकृष्ण ध्यानीं गर्जला प्रल्हाद । पिता गर्वामध्यें क्रुद्ध भारी ॥१४॥
हरीच्या भक्तासी विघ्न केलें भारी । तारीतो श्रीहरी वेळोवेळां ॥१५॥
न चले उपाय बोलाविली कांता । तियेसी ममता बोले गुज ॥१६॥
प्रल्हादासी विष द्यावें त्वां सत्वरी । पुत्र नव्हे वैरी जन्मा आला ॥१७॥
आवेशें ह्मणोनी धांविन्नली माय । येरे पुत्रराया कवळीला ॥१८॥
धरोनियां हातीं बैसवी भोजना । आसूं ये नयना जळ वाहे ॥१९॥
नवमास उदरीं कासया ठेविला । विष द्यावयाला चांडाळीनें ॥२०॥
तुजवीण प्रल्हादा काय करु आतां । तुझा तुज पिता विष घाली ॥२१॥
पुत्रा विष देतां न दे शके माता । गुणाची ममता बाधितसे ॥२२॥
भ्रताराची आज्ञा मोडितां गे माते । पाप तें अद्भुत जन्मावरी ॥२३॥
देई माते विष नको धरुं करुणा । श्रीयाळ चांगुणा पुत्रदान ॥२४॥
रुक्मांगद कांता छेदिती पुत्रासी । रुक्मांगद एकादशी ह्मणोनियां ॥२५॥
सुकुमार बाळ मोकलिलें वनीं । तयासी भोजन अमृतबिंदु ॥२६॥
नको येऊं माते पहा काकुलती । मृत्यु तुझ्या हातीं थोर भाग्यें ॥२७॥
पित्याचें वचन करी माते सत्य । सत्वर दोष होत मोडीतां तें ॥२८॥
पुत्राचें वचन धरोनियां कंठीं । भरोनियां वाटी विष घाली ॥२९॥
विषाची ती वाटी लावियेली ओठीं । घट घट घोटी प्रेमरस ॥३०॥
पिता पाहे पुत्र हरिनामें गर्जत । पाचोरोनी त्यातें काय बोले ॥३१॥
कैंचा राम कृष्ण कोण तुज रक्षीत । ह्मणोनियां हात खड्गा घाली ॥३२॥
जळीं स्थळीं राम काष्ठीं ही पाषाणीं । खांबांत ह्मणोनी प्रगटला ॥३४॥
आसंडोनी विधी पाडी मांडीवरी । नखाचिये अग्रीं उर्ध्व चिरी ॥३५॥
मारियेला दैत्य प्रल्हाद रक्षिला । तुका ह्मणे त्याला विसरूं नको ॥३६॥
N/A
References : N/A
Last Updated : July 18, 2019
TOP