धांवा द्रौपदीचा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८१८४॥
धर्म द्वेष करी सदा दुर्योधन । धाडीला छळानें वनवासा ॥१॥
तरी दुष्टबुद्धी न राहे उगला । नानापरी घाला घालीतसे ॥२॥
दैवें काळ आला दुर्वास आश्रमा । आपुल्या स्वकामा इच्छिलासे ॥३॥
मागितल्या वेळे सिद्ध पदार्थासी । आणूनि आंगेसी दास्य करी ॥४॥
कोपभेणें सर्वकाळ सावधान । हस्त ते जोडून उभा असे ॥५॥
बहु दिन झाले नेमासी न टळे । झालिया कृपाळू ऋषी त्यासी ॥६॥
मग ह्मणे नष्ट धर्म छला वनीं । सुकृतासी हानी करा त्याच्या ॥७॥
अवश्य ह्मणोनि उठला सत्वर । शिष्यादि सहस्त्र साठी संगें ॥८॥
आला छळावया वनांत दुर्वास । दोन प्रहरास रात्र झाली ॥९॥
गर्जना ऐकतां उठले सकळ । वंदिले तत्काळ धर्मादिकीं ॥१०॥
सांगती क्षुधित कोप माझा ठावा । विलंबासी तेव्हां शापीन मी ॥११॥
मार्गी येतां स्नान कर्म सांगमंत्र । सारीतां हे रात्र झाली माजी ॥१२॥
तुका ह्मणे ऋशी धाडोनियां स्नाना । तेव्हां नारायणा आठविलें ॥१३॥
॥८१८५॥
करुनियां स्नान वृंदावनीं उभी । लक्ष पद्मनाभीं ठेवियलें ॥१॥
यथाविधी मनीं आठविले पाय । उठे देवराय लगबग ॥२॥
न करी आळस प्रिया एकांतासी । रात्री दुर देशीं न विचारी ॥३॥
सांडुनी गरुड धांवे नग्न पायीं । क्षुधिलो मी आई देई आतां ॥४॥
ऋषीलागीं तुझा पुकारिला धांवा । तुजसाठीं देवा ह्मणूं कोण ॥५॥
असेल जे शिळें उरलें जें कडें । वोढविला पुढें हात देत ॥६॥
आणिनियां दावी दृष्टी पाकपात्र । कृष्ण ह्मणे तत्र आहे कांहीं ॥७॥
पाहे तंव शाखा देंठ लावियला । हात पसरिला त्यांत घाली ॥८॥
ह्मणे कृष्णार्पण देव घाली तुळशी । तेणें विश्व सुखी धालेपणें ॥९॥
दिधला ढेंकर उदक तुळशी । तेणें हृषीकेशी संतोषला ॥१०॥
संतोषला देव तृप्त केले ऋषी । न कळे कोणासी विंदान हें ॥११॥
तुका ह्मणे देव भक्तां साहाकारी । न सांगतां करी सर्व काज ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : July 18, 2019
TOP