हरिपाळचरित्र
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८२४०॥
हरिपाळ भक्त आवंढयानागनाथीं । पांडुरंगीं भक्ती दृढ ज्याची ॥१॥
धनुष्य बाण करीं रानीं वाट पाडी । संतांची आवडी सेवा करी ॥२॥
आषाढी कार्तीकी पंढरीची वारी । हरिपाळ करी अखंडीत ॥३॥
कोणें एके काळीं संतांची मंडळी । आवंढीया आली यात्रा करित ॥४॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई । नामदेव जनाई रोहीदास ॥५॥
चोखामेळा माहार गोरा तो कुंभार । सांवता कबीर चांगदेव ॥६॥
करितां देवार्चन हरिपाळ धांवला । जावोनी लागला चरणांसी ॥७॥
तुळसीवृंदावनीं पुजीयेले संत । घरामाजी कांते पुसतसे ॥८॥
भोजन सारोनी तोषवे सज्जन । राखे सत्व प्राणप्रीये माझें ॥९॥
येरी ह्मणे घरीं नाहीं एक दाणा । देई ह्मणे बाणा हरिपाळ ॥१०॥
पांच बाण धनुष्य घेवुनीयां करीं । गेला वनांतरीं हरिपाळ ॥११॥
टेकावरी वाट वैसोनीयां पाहे । तंव कोणी नये वाटसरु ॥१२॥
गेलें सत्व धांव पांडुरंगा वेगीं । नाहीं तरी त्यागी प्राण आतां ॥१३॥
सारुनीयां ताट उठे चक्रपाणी । पुसती रुकमीणी कोठें जातां ॥१४॥
येरु ह्मणे हरिपाळाचीया घरा । जाणें आहे त्वरा भोजनासी ॥१५॥
रुक्मादेवी ह्मणे मी वो संगें येतें । चालावें त्वरितें उठा ह्मणे ॥१६॥
सावकार झाला पंढरीचा राणा । रुक्मादेवे जाणा संगें घेत ॥१७॥
कांतेचे आर्जव करी सावकार । झाला वेषधर पांडुरंग ॥१८॥
कनकाची गाडी दोघां देखीयलें । हरिपाळा झालें समाधान ॥१९॥
हरिपाळ ह्मणे घोर हें अरण्य । आतां दोघे जण जाल कोठें ॥२०॥
सावकार ह्मणे मजुरी घेवून । आह्मासी हें रण पार करी ॥२१॥
हरिपाळ पुढें गाडीमागें मागे । जात असती वेगें वनामाजी ॥२२॥
हरिपाळ ह्मणे हरीचर्चा सांगा । वाचे पांडुरंगा आळवा जी ॥२३॥
येरु ह्मणे त्यासी कैसारे भगवंत । माझें कुळदैवत कांता माझी ॥२४॥
कांता माझा देव कांता माझा धर्म । सांगतसे वर्म हरिपाळा ॥२५॥
ऐकूनीयां बाण धनुष्यीं लाविला । पाडीन हो पळा सावकारा ॥२६॥
रुखमादेवी ह्मणे देई चुडेदान । संरक्षीरे प्राण भ्रताराचा ॥२७॥
हरिपाळ ह्मणे सर्व आळंकार । काढावे सत्वर दोघीजणीं ॥२८॥
सर्व आळंकार काढोनी दिधलें । हरिपाळें घातले गाडीवरी ॥२९॥
चतुर्भुज झाला पंढरीचा राणा । लागला चरणा हरिपाळ ॥३०॥
रुक्मीणीसहित आणियेला घरा । दिनांचा सोयरा पांडुरंग ॥३१॥
देवा आणि संता झालें एकपण । केलेंसे पूजन हरिपाळें ॥३२॥
भोजन सारुनी बैसले कीर्तनीं । नामदेव मनीं आनंदला ॥३३॥
पंढरीचा राणा लुटुनी आणिला । पवाडा हा केला हरिपाळें ॥३४॥
पंढरीचा राणा आला पंढरीस । आपुल्या देशास संत गेले ॥३५॥
तुका ह्मणे विठो करितां कीर्तन ॥ झालें समाधान सदोदीत ॥३६॥
N/A
References : N/A
Last Updated : August 01, 2019
TOP