आरत्या - ८२७२ ते ८२८०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८२७२॥
आपुल्या आवडी । उभा दोन्ही कर जोडी ॥१॥
आजि पुरविसी आर्त । धन्य मानिलें संचित ॥२॥
निरांजन हे आरती । वारंवार करुं स्तुती ॥३॥
तुका ह्मणे जिवें भावें । नव्हें उत्तीर्ण गौरवें ॥४॥
॥८२७३॥
कर्पुर आरती । ओंवाळीन लक्ष्मीपती ॥१॥
भावाभाव हारपले । मन हेत पारुषले ॥२॥
झाली जिवासी विश्रांति । स्थिरावली चित्तवृत्ती ॥३॥
तुका ह्मणे एक भक्ति । नाहीं जीव दशा चित्तीं ॥४॥
॥८२७४॥
करुं आरती सप्रेम । ओंवाळीला सर्वोत्तम ॥१॥
आनंदीआनंद । सर्व भरला गोविंद ॥२॥
दावियले पाय । स्तब्ध झालीं हीं इंद्रियें ॥३॥
तुका ह्मणे मन । कृत्य झाले हे लोचन ॥४॥
॥८२७५॥
दैत्यभारें पीडिली पृथ्वी बाळा । ह्मणोनि तुज येणें झालें गोपाळा ॥
भक्तप्रतिपाळक उत्सव सोहला । मंगळें तुज गाती आबळा बाळा ॥१॥
जयदेव जयदेव जयगरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा ॥ आरती ओंवाळूं तुज भक्तिकाजा ॥ध्रु०॥
गुण रुप नाम नाहीं जयासी । चिंतिता तैसाचि होसी तयांसी ॥
मत्स्य कूर्म वराह नरसिंह झालासी । असुरां काळ म्हूण ठाके ध्यानासी ॥२॥
सहस्त्र रुपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती ह्मणती तुज विश्वंभरा ॥
जीवनां जीवन तूंचि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥३॥
संतां महंतां घरीं ह्मणवी ह्मणियारा । शंखचक्र गदा आयुधांचा भारा ॥
सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥
भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळही गंगा झाल्या तुजपासून ॥
उत्पत्ति प्रळय तूंचि करिसी पाळण । धरुनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥५॥
॥८२७६॥
काय तुझा महिमा वर्णू मी किती । नाममात्रें भवपाश तुटती ॥
पाहतां पाऊलें हे विष्णुमूर्ती । कोटिकुळांसहित जग उद्धरती ॥१॥
जयदेव जयदेव जयपंढरीराया । श्रीपंढरीराया ॥
करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु०॥
मंगळ आरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा ॥
श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥
धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी ।
विष्णूचें पूजन एका भावेंसी । नित्य मुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥३॥
न वजे वायां काळ जे तुज ध्याती । असे तुझा वास तयांच्या चित्तीं ॥
धाले सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीर्थे मळिण वास तयांचा पाहती ॥४॥
देवभक्त तूंचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं ॥
जड जीवां उद्धार होय लागोनी । शरण तुका वंदी पाऊलें दोन्ही ॥५॥
॥८२७७॥
पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिणवाहिनी । तीर्थ चंद्रभागा महापातकां धुनी ।
उतरलें वैकुंठ महा सुख मेदिनी ॥१॥
जयदेवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुह्मां लक्ष्मीकांता ॥ध्रु०॥
नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचा गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर ।
मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥२॥
हरिनामकीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथींच्या नारी ।
जीवन्मुक्त लोक नित्य पहाती हरी ॥३॥
आषाढी कार्तिकी ही गरुडटक यांचा भार । गर्जती नामघोषें महावैष्णववीर ।
पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥५॥
हे सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारलें आह्मालागिं हें सोपें ।
ह्मणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥६॥
॥८२७८॥
अवतार गोकुळीं हो जन तरावयासी । लावण्य रुपडें हें तेज:पुंजाळरासी ॥
उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरा मही थोर मानसीं ॥१॥
जय देवा कृष्णनाथा जय रखुमाई कांता । आरति ओंवाळीन तुह्मां देवकीसुता ॥
जय देवा कृष्ण्नाथा ॥ध्रु०॥
वसुदेवदेवकीची बंद फोडिली शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटीचा बाळ ॥
दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥
राखितां गोधनें हो इंद्र कोपला भारी । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं ॥
राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥
कौतुक पहावया माव ब्रम्हानें केली । वत्सेंही चोरुनियां सत्य लोकासीं नेलीं ॥
गोपाळ गाई वत्सें दोहीं ठायीं राखिलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माऊली ॥४॥
तारिलें भक्तजना दैत्य निर्दाळूनि । पांडवा साहकारी आडल्या निर्वाणीं ॥
गुण मी काय वर्णू मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देई चरणीं ॥५॥
॥८२७९॥
सुंदर अंगकांतीं सुख भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरा रेख ॥
मस्तकीं मुगुट कानीं कुंडलें तेज फांके । आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥
जय देवा चतुर्भुजा जय लावण्य तेजा । आरति ओंवाळीन भवतारिया हा वोजा ।
जय० ॥ध्रु०॥
उदार जुंझार हा जया वाणी श्रुति । परतल्या नेति ह्मणती तयां नकळे गति ॥
भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगली साही अठरा रुप न गति ॥२॥
ऐकोनि रुप ऐसें तुजलागीं धुंडिती । बोडके नग्न एक निराहार यती ॥
साधन योग नाना तपें दारुण किती । सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥३॥
भरुनि माजी लोकां तिहीं नांदसि एक । कामिनी मनमोहना रुप नाम अनेक ॥
नासती नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥
उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तत्वासी तत्वसार मूळ झालासी बीज ॥
खेळसी बाळलीला अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडुनि तुज ॥५॥
॥८२८०॥
महाजी महादेवा महाकाळमर्दना । मांडियेलें उग्र तप महादीप्त दारुणा ॥
परिधान व्याघ्रांबर चिताभस्मलेपना । स्मशान क्रिडा स्थळ तुह्मां जी त्रिनयना ॥१॥
जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओंवाळीन कैवल्यदातारा । जय०॥ध्रु०॥
रुद्र हें नाम तुह्मां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं ॥
उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुले पद दासां ठाव देई कैलासीं ॥२॥
त्रैलोक्यपाळका हो जन आणि विजन । विराटस्वरुप हें तुझें साजिरें ध्यान ॥
करिती वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥३॥
बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतर पापें पळती वेगीं ॥
हर हर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिली दृष्टि चरणीं रंग मीनला रंगीं ॥४॥
पूजूनि लिंग उभा तुका जोडोनि हात । करितो विज्ञापना परिसावी हे मात ॥
अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चित्त । घातलें साष्टांग मागे मस्तकीं हात ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : August 01, 2019
TOP