मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

दामाजीपंताचें चरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२०२॥
दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । निष्ठा त्याची बरी देवापाशीं ॥१॥
दामाजीचे साठीं आविंदाची स्वारी । आली ते पंढरी पहावया ॥२॥
आविंदाची स्वारी आली तें ऐकून । पळाळे ब्राह्मण क्षेत्रवासी ॥३॥
समस्त ब्राह्मण गेले ते पळोन । राहिले धरुन द्विज दाहा ॥४॥
दाहांतुनी पांच चंचळ झाले चित्तीं । राहतां येथें गती बरी नाहीं ॥५॥
विचारिती द्विज जावें भेटावया । आणिक उपाया नसे कांहीं ॥६॥
बुका तुळसीमाळ देवाचे नारळ । घेउनी सकळ चालियेले ॥७॥
विचारिती द्विज आविंदा नावडे । पुष्पांची आवड जाईची त्यां ॥८॥
ब्राह्मणाची कन्या देव होउन आला । अंगावरी शेला पुष्पांचा तो ॥९॥
रजस्वला नारी झालें ओटीभरण । जाईचा गुंफोन टोप शिरीं ॥१०॥
देवाचें दर्शन घ्यावयासी आला । सवें बाप तिला समागमें ॥११॥
घेवोनियां टोप घातला मस्तकीं । जाती ठाकोठाकी भेटावया ॥१२॥
सांगती ते द्विज मसुद्यालागून । सांगाया जाऊन रायापाशीं ॥१३॥
दामाजीचा पीर त्याचे मुंजावर । आले ते सत्वर भेटावया ॥१४॥
ठेउनी तबक कुर्निसा करिती । ह्मणती येथें गती बरी नाहीं ॥१५॥
बुका तुळसीमाळ देवाचे नारळ । पाहुनी सकळ ठेवियेलीं ॥१६॥
घेउनियां टोप पाहे न्यहाळून । अपूर्व देखून हास्य करी ॥१७॥
एक एक पुष्प पाहे सावकाश । तया माजि केंस देखियेला ॥१८॥
पुसतो आविंद टोप हा कोणाचा । ह्मणती विठोबाचा असे कीं हा ॥१९॥
पाषाणासी केंस नाहीं ते फुटले । नव्हतें ऐकिलें शास्त्रामाजि ॥२०॥
बांधुनियां द्विज घातले पुढारीं । पाहुनियां बरी शिक्षा करुं ॥२१॥
पांचांचा वृत्तांत ऐकिला श्रवणीं । म्हणती पळोनी जावें आतां ॥२२॥
राऊळांतुन द्विज आले गरुडपारीं । आविंदाची स्वारी चंद्रभागे ॥२३॥
द्विजांसी पुढारी घेऊनियां आला । दर्शनासी गेला विठोबाच्या ॥२४॥
विटेवरी दोन्ही देखिले समचरण । पाहुनी उन्मन झाला तेव्हां ॥२५॥
काढोनियां टोपी बडवे पहाती । कांहीं नाहीं ह्मणती जैसा तैसा ॥२६॥
अवचट केंस विठोबासी आले । भक्तांचें विठ्ठलें साह्य केलें ॥२७॥
तेव्हां तो आविंद पाहे डोळांभर । मस्तकीं कुरळ भार देखे ॥२८॥
मस्तकींचे केंस भुमीसी लोळती । आश्चर्य करिती आविंद ते ॥२९॥
येउनी आविंद केंस उपटिला । अशुद्धाचा आला लोट तेव्हां ॥३०॥
अंत म्यां पाहिला अज्ञानमतीनें । अपराध करणें क्षमा आजि ॥३१॥
द्विजांसी सोडुनी देवांसी पुजीलें । अपार द्रव्य दिलें द्विजालागीं ॥३२॥
आविंद गेलीया भरली पंढरी । भक्तांचा कैवारी तुका ह्मणे ॥३३॥


References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP