सीताशोक
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८००७॥
आशोकाच्या वनीं सीता शोक करी । कांहो अंतरले रघुनाथ दुरी ॥
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिलें अवघड लंकापुरी ॥१॥
सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ ॥
मन उताविळ झाला दुरी पंथ । राहो न सके प्राण माझा कुडी आंत ॥२॥
काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें ॥
गाईवत्सा पत्नीपुरुषा बिघडिलीं । न कळे वो संचित चरण अंतरलें ॥३॥
नाडियेलें आशा मृगकांतिसोनें । धाडिलें रघुनाथा पाठीलागे तेणें ॥
उलंघिली आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥४॥
नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।
उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढयामध्यें तेथें चाले काये ॥५॥
जनकाची नंदिनी दु:खें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।
संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेईल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : July 18, 2019
TOP