मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

पदें - ८२५१ ते ८२६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२५१॥
आज लढूं निरबान । गुरुजी ॥ध्रु०॥
तुमारे चरनपर दुरवा राखूं । सीस करुं कुरबान ॥१॥
पांचपचीस हत्ती सवारुं । उपर लाल निशान ॥२॥
एकवीस हजार सब घोडे । हाथ लिये नव बान ॥३॥
चारो महालमे धुम मचाई । किया मुलुख मैदान ॥४॥
दास तुका कहे सल्ला हमारा । लगा उन्मनी ध्यान ॥गुरुजी०॥५॥

॥८२५२॥
विठ्ठल विठ्ठल बोल मना । कर साधन सोपें ॥
होइ जागा आवची झोंप ॥ध्रु०॥ प्रपंच विषयीं झोंप आली ।
केली तिणें गर्दी ॥ हालविली मर्दाची मर्दी ॥
स्वहित आपुले नेणोनियां । होसि तिचा वर्जी ॥
ऐसा कैसा बेदरदी ॥ कन्यादाराधनपुत्रीं । विषयावरि लोलुप ॥
होइ जागा आवरीं झोंप ॥१॥
भ्रांति तुजला कशि पडली । जडली क्रिया आधि ॥
नाना परिची उपाधी । रामराम हा घ्या मंत्र ॥
हो तारक सिद्धी । मुख्य साधन हें तूं साधी ॥
घडिघडि पळपळ । विसरुं नको लागोदें चोप ॥
होइ जागा आ०॥२॥
झोंप नव्हे हा काळ तुजला ग्रासाया पाहतो ।
आयुष्य घेउनियां जातो ॥ नाशवंत हा नरदेह क्षणभंगुर मूर्ती ।
पडशिल काळाचे हातीं ॥ हरि भजनाविण तुजवरता काळ करिल कोप ।
होइ जागा आवरी झोंप ॥ विठ्ठ०॥३॥
मृगजळवत संसार सख्या झोंप किती घेशी । आतां तूं सावध कधिं होशी ॥
वीस पंचवीस्स साठींचा आला आकारासी । उघडी डोळा ध्याइ हरीशीं ॥
तुकारामाशी हरिभजनीं नित्य नामजप । होई जागा आवरी झोंप ॥
विठ्ठल विठ्ठल बोल० ॥४॥

॥८२५३॥
जगजीवन दिनदयाळारे । नित्य निरंजन सज्जन रंजन भक्तप्रतिपाळारे ॥
जगजीव० ॥१॥
दीन तुझे नुमजे मज साधन । अंगीकारी निज बाळारे ॥२॥
दुस्तर हा भवसागर पामर । दंशितसे यमकाळा रे ॥३॥
दीन तुका विनवी कर जोडूनी । नामसार जगपाळारे ॥ जगजी०॥४॥

॥८२५४॥
शामसुंदर सांवळी । उभी जणूं असे राउळीं ॥
ती आकाश ब्रम्हांड गिळी ॥ध्रु०॥
दादानो ठकडी बायको आली । भल्याभल्यासी ठकवून गेली ।
दादानोठ०॥१॥
चारी शून्याचे वरती । ज्ञानदृष्टीनें न्याहळती । चारी सूत्रें तिचे हातीं ॥
दादनो०॥२॥
बायको नव्हे पुरुष नव्हे दावी नाना रंग नटभाव । जैसा आकाशी विज वालवे ॥
दादानो०॥३॥
जे जे पाहूम गेले तिसीं । तिनें झोडपिलें तयांसी । तुकाराम शरण तिसीं ॥
दादानो ठ०॥४॥

॥८२५५॥
आनुंदुरे किं परमानंदुरे । जया श्रुती नेती ह्मणती गोविंदू ॥ध्रु०॥
आह्मा विठोबाची वेढी आनंदू सदा ॥ गाऊं नाचूं वाजवूं टाळी रिझवूं गोविंदा ॥१॥
सदा सण सात आह्मा नित्य दिवाळी । आनंदे निर्भर आमुचा कैवारी बळी ॥२॥
तुका म्हणे नाहीं जन्म मरणाचा धाक । संत सनकादिक हे आमुचें कौतुक ॥३॥

॥८२५६॥
पहा गे याच्या चरणासाठीं । सोसिली म्यां आटाआटी ॥
शाकी मज वाजाटी । ह्मणे गोवळा ॥१॥
प्रथमचि सोनारें । मोडुनी राजअक्षरें ॥
अग्निचिया सवकारें । आटिलें मज ॥२॥
तेथें तीवर घनघाई । सोसिली मी सांगूं काई ॥
वारोवार कुतराई । तापलें सई ॥३॥
ऐसी तेथें जाचणी । सोसिली मी साजणी ॥
ह्मणुनी अतिथी चरणीं । राहिले कृष्णा ॥४॥
ऐसा ऐकुनी त्याचा शब्द । वांकी चरण झालें बंद ।
झाला तुकयासी मोद । न माये गगनीं ॥५॥

॥८२५७॥
वेगें व्हावें सावधान गुरुपाय जोडा ॥ध्रु०॥
कशासाठीं तानमान । हालउनी गातां मान ॥
नका फार ब्रह्मज्ञान । अभिमान सोडा ॥१॥
घोका घोका पोथी पान । सारासार कार्यज्ञान ॥
होऊनियां समाधान । मग डोई बोडा ॥२॥
पांघरुनी भगवी शाटी । गुरुपदीं कटांकटी ॥
मोठी द्यावी हातवटी । बैसुनियां लोडा ॥३॥
दास तुका सांगे कानीं । गोपाळभट उमजा मनीं ॥
गोपाळनाथ ध्यानीं मनीं । बरे डोळे उघडा ॥४॥

॥८२५८॥
कोण कसी बनेल घटका । काळ करील क्षणांत मुटका ॥
हा अभिमान लटका । संगें येईना मणी फुटका । कोण०ध्रु०॥
प्राण्या गोष्ट ऐक थोडी । कोणाची महाल माडी ॥
हे येथेंच राहील कुडी । शेवटीं निघेल स्वारी सडी ॥ कोण०॥१॥
कांहीं कीर्ति करुनी पहा कीं । कोणाचे लेंक लेंकी ॥
ह्या उगवून नेती बाकी । कोणी नाहीं जिवाची सखी । कोण०।॥२॥
शुकानें टाकला काय । धन्य वाणी तुकाराम ॥
तेणें जोडीला घनश्याम । देहासुद्धां गेले वैकुंठा ॥
कोण कसी बनेल घटका ॥३॥

॥८२५९॥
आतां तरी जाय जाय । धरी सद्गुरुचे पाय ॥ध्रु०॥
नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । व्यर्थ त्याची काय ॥१॥
कोटी पाप त्वां जरि केलें । चुकविले सद्गुरुराय ॥२॥
नामस्मरणीं तुका ह्मणे । भिक्षा मागुनी खाय ॥३॥

॥८२६०॥
मन मोहन मुरलीवाला रे । नंदाचा अलबेला ॥ध्रु०॥
विदुराघरच्या भक्षुनी कण्या । सृष्टीपालनवालारे ॥१॥
भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत झाला रे ॥२॥
तुका ह्मणे भीमातिरीं । पुंडलिकें उभा केला रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP