कल्की अवतार
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८१३५॥
येगा पांडुरंगा स्वामी दयाळूवा । भेट देई देवा एक वेळां ॥१॥
आह्मा अनाथांसी कोण पावे दुजा । धांव अधोक्षजा नारायणा ॥२॥
वाटे मज चिंता पुढें होणारासी । केव्हां कली होसी नेणों देवा ॥३॥
तोंवरी हा कली जाची जिवांलागीं । पाहोनी व्यासंगीं संसाराच्या ॥४॥
तुका ह्मणे तुह्मा सांगों आतां किती । रुक्मिणीच्या पती भेटा आतां ॥५॥
॥८१३६॥
पाहे कृपादृष्टी मज देई भेटी । अनुमाना गोष्टी अल्प नका ॥१॥
पुढें वोढवलें दिसे अन्योविन्य । धुडाविलें पुण्य दोष बळी ॥२॥
राहतील कर्म शुद्ध आचरणें । मातले यौवन नावरती ॥३॥
कलीचें हें राज्य झालेंसे प्रबळ । काय तुम्ही डोळे झांकियेले ॥४॥
अनावर मन वर्ते हें वासर । भेटोनियां स्थिर करी मज ॥५॥
जनाचिये दये होऊनियां कल्की । विश्वजन सुखी करी बापा ॥६॥
विटेवरी पाय दावी नारायणा । तेणें माझ्या मना सुख होय ॥७॥
तुका म्हणे देव जगाचा ईश्वर । ते शक्ति उदार दावी मज ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : July 18, 2019
TOP