मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

रुक्मांगद राजाचें चरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८१४७॥
कांतीपुरीमाजी राजा रुक्मांगद । एकनिष्ठ शुद्ध पुण्य गांठीं ॥१॥
सत्वशील दया मूर्तीमंत आंगीं । न भंगे प्रसंगीं सत्व धीर ॥२॥
न्यायनीति पाळी गाईब्राह्मणांसी । स्थापिलें धर्मासी राष्ट्रामाजी ॥३॥
दीनांचे रक्षण साधूंचें पूजन । संतांचें वचन मान्य सदा ॥४॥
तुका म्हणे पुण्य साधियलें गांठीं । न बोलवे मीठी पडे वाचा ॥५॥

॥८१४८॥
पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश । श्रीहरी विशेषभक्ति जेथें ॥१॥
जाणोनीयां इंद्र पाठवी विमानें । आणवी सुमनें कांतीयेचीं ॥२॥
देवाच्या पूजना सुमन न मीळे । तया वनीं फुलें चोरीयेलीं ॥३॥
सेवक ह्मणती सायंकाळीं कांहीं । दिसों येत नाहीं रात्रींमाजी ॥४॥
रात्रीं जागरणा बैसले रक्षक । लाविला व्रतांक अग्नीकाष्ठ ॥५॥
सावधान ठायीं जागती सर्वही । विमान समयीं आलें तेथें ॥६॥
तोडिलीं सुमनें गुप्तवेषें त्यांनीं । विमान तें क्षणीं खोळंबलें ॥७॥
तुका ह्मणे नाशी काष्ठ उपायातें । न चले मागुतें कांहीं केल्या ॥८॥

॥८१४९॥
उगवला दीन सांगती रायातें । धरीयलें गुप्त तस्करासी ॥१॥
उगवले कोटी भानुप्रभा दिसे । येउनीयां पुसे राजा त्यासी ॥२॥
धन्य ग्राम पुण्यवंत भूमीजना । आह्मालागीं आज्ञा केली देवें ॥३॥
इंद्रें पाठविलें न्यावया सुमनें । पुण्यवंत जन ह्मणोनीयां ॥४॥
राहवया तुह्मा कोणतें कारण । लागला धूमाग्न व्रतांकांचा ॥५॥
तुका म्हणे पुढें पुशिला उपाय । पतीव्रता होये शुद्ध जाती ॥६॥

॥८१५०॥
आणविल्या सर्व गांवींच्या युवती । न चले कल्पांती कांहीं केल्या ॥१॥
आतां यासी काय करावा उपाय । येरु म्हणे पाहे गांवामाजी ॥२॥
पतिव्रता होय कां भलते यातीची । शुद्ध वासनेची एकनिष्ठ ॥३॥
रात्रीं जागरण निर्लज्य एकांतीं । घडली जे तीथी एकादशी ॥४॥
तियेचिये हातीं विमानासंगती । चालावया खंती वेळ नाहीं ॥५॥
तेव्हां पाचारीतां अन्य याती नारी । नेणत्या कुमारी होत्या त्याही ॥६॥
तिळभरी नाहीं चालावया रीघ । दंवडीसी वेगें धाडी राजा ॥७॥
तरुणी रजकी नवती यौवनी । बैसले रुसोनी एकांतासी ॥८॥
धुंडुनी धाडीला मायसासुराया । तो म्हणे मी राया ऐसा नोहें ॥९॥
येरी म्हणे मी तो कुळींची निर्दोष । शुद्ध माझा वंश रजकाचा ॥१०॥
ऐकिला संवाद दौंडीकरें त्याचा । जाणे विनोदाचा समाचार ॥११॥
पाठवुनी दूत आणविलें त्यासी । विस्मय सर्वासी होता झाला ॥१२॥
साशंकीत राजा लावी म्हणे हात । विमान क्षणांत उचलीलें ॥१३॥
धन्य म्हणे राजा मी माझी हे प्रजा । रजकाची भाजा धन्य झाली ॥१४॥
सांगें सकळांसी एकादशी करा । हरीच्या जागरा निजूं नका ॥१५॥
तुका म्हणे पुढें सांडा अभीमान तेव्हांच कारण साध्य होय ॥१६॥

॥८१५१॥
नेम निर्धारेंसी करी एकादशी । तृण ही पशूंसी घेऊं नेदी ॥१॥
राष्ट्रामाजी रुढी केली हरीभक्तीं । दया सर्वा भूतीं समान चि ॥२॥
हरीकीर्तनाच्या भरीयेल्या राशी । भेदीत आकाशीं पुण्य जाय ॥३॥
मध्यें कांहीं आला व्रतअंतराय । उपायच आहे माहीनीचा ॥४॥
तुका ह्मणे आतां स्त्रियादृष्टीसंगें । नामा होय भंग तात्काळीक ॥५॥

॥८१५२॥
भुलविला राजा लावण्याच्या तेजें । नेम व्रत राजें खोळंबीलें ॥१॥
राजपत्नी पुत्र नाम धर्मागद । चालविती शुद्ध एकादशी ॥२॥
बहू दीन होतां न कळे रायासी । मोहनीयापाशीं आकळीला ॥३॥
पुढें आली जाणा तेव्हां हरीदीनी । लोकांलागीं राणी सांगताहे ॥४॥
धेंडा पिटवीला श्रीहरी जागर । करा निरंतर निजों नका ॥५॥
तुका ह्मणे नृपें ऐकियलें कानीं । धिग ह्मणे प्राणी जन्मा आलों ॥६॥

॥८१५३॥
उतरला तळीं टाकीयली शय्या । स्नान सारी तया शीतोदकें ॥१॥
बैसे घालुनीयां तृणाचें आसन । सारी नित्य ध्यान यथाविधी ॥२॥
नेमा भंग झाला वर्जिली मोहीनी । नाइके तो ध्यानी बैसलासे ॥३॥
आडवी मोहीनी उगवतां दीन । सत्वाचें हरण केलीं कैसें ॥४॥
मज दिली भाक उगवली आजी । प्रतिज्ञा हे माझी खरी झाली ॥५॥
देई मज आज्ञा सोडी कां उदक । सुकृताचें बीज न्यावयासी ॥६॥
चिंतावला राजा मागें पालटासी । ह्मणे पदार्थासी देईन त्या ॥७॥
येरी ह्मणे तुज कुळदीप झाला । देई तो मजला कापोनीयां ॥८॥
नाहीं चाड मज पदार्थी अनेक । कापोनियां दे कां मस्तक हें ॥९॥
तुका ह्मणे राया दोहोंपरी धाक । न सुचे विवेक तया वेळीं ॥१०॥

॥८१५४॥
मात कळे सारी पत्नी पुत्रा वेगें । पातलीं तीं दोघें रायापाशीं ॥१॥
गोविंयला राजा दिसे वेडा झाला । राणी बोले तिला माग कांहीं ॥२॥
येरी ह्मणे दिल्हें तुझिया पुत्राचें । आपुलिया वाचे शीर मज ॥३॥
चटकली राणी पाहिलें कुमरें । येऊं ह्मणे बरें निकें झालें ॥४॥
पित्याचिया देह हा वेंचावा । तेव्हांची बरवा दिसें लोकीं ॥५॥
सुखवला पुत्र म्हणे मातेप्रती । वांचवी भूपती सत्वाहातीं ॥६॥
तोषल्या श्रीपती मज ऐसें कीति । पुत्र तुह्मां होती सत्वधीर ॥७॥
तुका ह्मणे कोणी सत्वानें आगळा । प्रिय तो गोपाळा तोची एक ॥८॥

॥८१५५॥
वोढवोनी मान आला रायापाशीं । निर्भय मानसीं धर्मागद ॥१॥
घेऊनियां शस्त्र स्मरिला अच्युत । उभारिला हात मारावया ॥२॥
अंतकाळीं केलें देवाचें स्मरण । तेव्हां नारायण धांव घाली ॥३॥
धरीयला हात माथां ठेवी कर । म्हणे मागा वर कांहीं मज ॥४॥
तुका ह्मणे ज्याच्य्ता नाम आलें मुखा । पांडुरंग सखा होय त्याचा ॥५॥

॥८१५६॥
आश्वासिले भक्त दिलें सर्व सुख । बैसतील लोक विमानांत ॥१॥
नाहीं नरपशू जीव जंतू भूतें । विमानीं समस्त बैसविलीं ॥२॥
पातली मोहीनी ह्मणे देवराया । सांडसी कां वांया मजलागीं ॥३॥
कोण अपराध घडलासे मज । पांडुरंगा साजे नाम तुह्मा ॥४॥
इंद्र आज्ञेमुळें छळियेलें राया । तुका म्हणे पायां लागतसे ॥५॥

॥८१५७॥
आली कृपा त्याची दिधलासे वर । राहा निरंतर मृत्युलोकीं ॥१॥
पुढें हरीदीनी जे कोणी करीती । द्वादशीस घेती निद्रा कांहीं ॥२॥
त्याचें पुण्य़फळ मजलागी प्राप्त । हो कां जरी आप्त मज प्रिये ॥३॥
तेणेंपुण्ये तूझा होईल उद्धार । देऊनियां वर ठेवीयली ॥४॥
तुका म्हणे धर्म सांगतों हा मानी । जागावें कीर्तनीं अहर्निशी ॥५॥

॥८१५८॥
सकळ नगरी वाहिली विमानीं । वैकुंठभुवनीं पाववीली ॥१॥
करा एकादशी जागर कीर्तन । द्वादशी भोजन द्वीज पंथी ॥२॥
दिवसास करी हरीचें स्मरण । श्रीहरीचिंतन मनामाजी ॥३॥
तुका म्हणे तेव्हां साधनाचें फळ । नाहीं तरी मूळ नरकासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP